****झांजरोली(केळवारोड) धरणाचा माती-दगडी संरक्षक भराव खचला; २८६ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर ; १००% भरलेल्या धरणातून २,९५१ क्युसेक्स विसर्ग, ****

Date: 2026-07-06
news-banner

नवयुग पालघर

****झांजरोली(केळवारोड) धरणाचा माती-दगडी संरक्षक भराव खचला; २८६ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर ; १००% भरलेल्या धरणातून २,९५१ क्युसेक्स विसर्ग, ****

**जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड घटनास्थळी; एनडीआरएफ तैनात, धूप रोखण्यासाठी तातडीने मजबुतीकरण सुरु**

        पालघर, दि. ६ जुलै : मुसळधार पावसामुळे पालघर तालुक्यातील माहीम-केळवा लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेल्या केळवा (झांजरोली) धरणाची पाणीसाठा क्षमता १०० टक्क्यांपर्यंत भरली असून, धरणाच्या पश्चिमेकडील माती-दगडी संरक्षक भरावाचा काही भाग खचल्याने प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या धरणातून २,९५१ क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू असून संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणाखालच्या गावांतील नागरिकांचे युद्धपातळीवर स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत २८६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे.

           गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जलसाठा ३.२४२ दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे नियमानुसार सांडव्यातून २,९५१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

            दरम्यान, सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे धरणाच्या पश्चिमेकडील माती-दगडी संरक्षक भरावाचा काही भाग खचल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धूप रोखण्यासाठी गोण्या व दगडांच्या साहाय्याने तातडीने मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाची यंत्रणा यांत्रिक सामग्रीसह घटनास्थळी कार्यरत असून, मुसळधार पावसामुळे कामात अडथळे येत असले तरी दुरुस्तीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधीक्षक अभियंता सचिन पाटील यांनी दिली.

            जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, तहसीलदार रमेश शेंडगे, जलसंपदा, महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यास अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्था तत्काळ कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

             धरणाखालच्या आठ गावांतील संभाव्य धोक्याच्या क्षेत्रांची ओळख पटविण्यात आली असून मंडळपाडा (झांजरोली), देवशेत पाडा, तरडे पाडा, देवी पाडा, सांबरदहाड पाडा, डोंडल पाडा, पाटील पाडा आणि पठारी पाडा या भागांतील नागरिकांना आगाऊ सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय दसमाळा, भुतान माळ, झांझरोळी, भरणपाडा, टोकराळे, मायखोप, पळगेपाडा, बेंदळी, राठे, रवलपाडा, माकुणसार आदी गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

                प्रभावित क्षेत्रातील आठ गावांपैकी चार गावे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. सुरुवातीला सुमारे १३० कुटुंबांच्या स्थलांतराची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण २८६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. उर्वरित धोकादायक क्षेत्रांमध्येही स्थलांतर आणि बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची एक टीम झांजरोली येथे तैनात असून एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकडीचीही मागणी करण्यात आली आहे.
                झांजरोली/केळवा धरणातून केळवे व सफाळे परिसरातील सुमारे १९ गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेला पाणीपुरवठा केला जातो. तसेच धरणाच्या खालच्या भागातील शेतीसाठी सिंचनाचे पाणीही उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे धरणाची सुरक्षितता आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

             खासदार डॉ. हेमंत सवरा आणि आमदार राजेंद्र गावित यांनीही जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

            जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिकांना नदीपात्र, सांडवा आणि वेगवान पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सद्यस्थितीत प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

Leave Your Comments