नवयुग पालघर
****पूरस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पालघर जिल्हा दौरा;
१,२०० नागरिकांचे स्थलांतर,
१० मृत्यूंची नोंद; ****
**पूरप्रश्नावर वैज्ञानिक अभ्यास करण्याचे सूतोवाच**
पालघर, दि. ७ जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी संध्याकाळी पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त काही भागांचा दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेतला.
पालघर–मनोर-विक्रमगड, जव्हार मार्गावरील पाचमाड नाल्यावरील उड्डाणपूल तसेच माहीम–केळवा (झांझरोली) धरणाची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेतला.
प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १,२०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून, पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी यावेळी दिली.
पूरस्थितीची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नामांकित संस्थेकडून वैज्ञानिक अभ्यास करून त्याआधारे दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री महाजन यांनी केली. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व बचावकार्याची मंत्री महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
दौऱ्यादरम्यान मंत्री महाजन यांनी पालघर–जव्हार मार्गावरील विक्रमगड तालुक्यातील पाचमाड नाल्यावरील उड्डाणपुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी खासदार हेमंत सावरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जव्हारच्या प्रांताधिकारी अपूर्वा बासुरे, सहायक जिल्हाधिकारी अमोल पी., जलसंपदा विभागाच्या अभियंता वैशाली नारकर, वाडा येथील प्रांताधिकारी संदीप चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यानंतर मंत्री महाजन यांनी माहीम–केळवा (झांझरोली) धरणाचीही पाहणी केली. मुसळधार पावसामुळे धरणाच्या मातीभरावाचे अश्मपटल (पिचिंग) ढासळल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी मंत्री महाजन यांनी म्हात्रेवाडी तसेच केळवा–माहीम धरणालगतच्या गावांतील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन वस्त्यांना जोडणारा पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
#नवयुगपालघर #अतिवृष्टी #palghardistrict #GirishMahajan