नवयुग पालघर
***'पाचबत्ती नाही, हुतात्मा चौक" असाच या ऐतिहासिक स्थळाचा उल्लेख करावा...'***
*रोटरीच्या 'वात्सल्य वेल'मध्ये जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना गायिका पुष्पा पागधरे भावूक; डॉ. सुनित राऊत यांचे हुतात्मा चौकाबाबत भावनिक आवाहन*
पालघर, दि. २ जुलै : एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या कार्याचा गौरव करणारा पुरस्कार हा केवळ सन्मान नसतो, तर त्या व्यक्तीच्या संघर्ष, कष्ट, जिद्द आणि त्यामागे उभ्या राहिलेल्या माणसांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञताही असते. रोटरी क्लब ऑफ पालघर आणि इनरव्हील क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने नवली येथील कै. गोविंदराव दा. ठाकूर सभागृहात आयोजित 'वात्सल्य वेल' या ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्यात हेच चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ मराठी गायिका पुष्पा पागधरे आणि ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुनित राऊत यांना रोटरी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर दोघांनीही मांडलेल्या आठवणी आणि भावना उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेल्या.
कार्यक्रमात मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन दोन्ही मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष भूषण सावे यांनी सांगितले की, पुष्पा पागधरे यांनी आपल्या सुमधुर, भावस्पर्शी आणि सुरेल गायकीने असंख्य रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. संगीतकलेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तसेच डॉ. सुनित राऊत यांनी आयुष्यभर वैद्यकीय सेवेत करुणा, समर्पण आणि सेवाभाव जपत समाजाची निःस्वार्थ सेवा केली असून पर्यावरण व निसर्ग संवर्धनासाठीही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी योगदानाचा गौरव करताना रोटरी क्लबला आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भूषण सावे यांनी रोटरी क्लबच्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती देताना डायलिसिस सेंटर, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, शेतकरी बांधवांसाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यशाळा राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
इनरव्हील क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्षा अनुश्री जयेश आव्हाड यांनी मैत्री, सेवा आणि स्नेहभाव या त्रिसूत्रीवर आधारित सामाजिक उपक्रम अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला. अंगणवाडी केंद्रे, जिल्हा परिषद शाळांचे नूतनीकरण तसेच विविध आरोग्यविषयक प्रकल्प आगामी काळात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
**"माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कोणीतरी हात धरला..."**
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना पुष्पा पागधरे भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, "माझा सत्कार केला, मला फार आनंद झाला. मला आज माझ्या सातपाटीची नाही तर पालघरची आठवण आली."
संगीत क्षेत्रात पहिले बाळकडू मला माझ्या वडिलांकडून मिळाले. त्यानंतर शाळेतील शिक्षक आर. जी. बेंद्रे यांनी लहानपणापासून तब्बल पंधरा वर्षे मला विनामूल्य संगीताचे शिक्षण दिले.
त्या पुढे म्हणाल्या, "माझे पती चंद्रकांत पागधरे यांनी माझ्यातील कलेकडे लक्ष देण्यासाठी मला सतत प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळेच माझा हा प्रवास होऊ शकला. त्यांनी मला मुंबईला पाठवले आणि सातपाटीचे नाव मोठे करण्याची संधी मिळाली."
मनोगत संपवताना त्यांनी "इतनी शक्ती हमें देना दाता" हे गीत सादर केले. सभागृहात काही क्षण शांतता पसरली आणि त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.
**"मी या पुरस्कारासाठी पात्र आहे का, असा प्रश्न मला पडला होता..."**
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना डॉ. सुनित राऊत यांनी सुरुवातीलाच रोटरी क्लब आणि विशेषतः
डॉ. डांगे तसेच रोटरीचे अध्यक्ष भूषण सावे यांचे आभार मानले.
"जीवनगौरव पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचे समजल्यानंतर मी खरोखरच या सन्मानासाठी पात्र आहे का, असा प्रश्न मला पडला होता. रोटरी क्लबचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी माझी दखल घेतली, याचा मला आनंद आहे," असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, त्यांचे आई-वडील दोघेही समाजसेवक होते. त्यांनी आदिवासी समाजात संपूर्ण आयुष्य वेचले आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांना दलित मित्र पुरस्कार मिळाला होता. "त्यांच्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे," असे त्यांनी नमूद केले.
मोखाड्यासारख्या दुर्गम भागात शिक्षण घेतल्याची आठवण सांगताना ते म्हणाले, "आम्ही गरीब होतो; पण आई-वडिलांनी आम्हाला भरपूर पुस्तके वाचायला दिली. वाचनाची सवय हीच आमची खरी संपत्ती होती."
पत्नी डॉ. सुशीला राऊत यांनी प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ दिली. तसेच डॉ. दादा वर्तक, निसर्ग निरीक्षक डॉ. दवे, जयंतीबेन श्रॉफ आणि डॉ. बेहराम यांनी वेळोवेळी आधार आणि मार्गदर्शन केले. "प्रामाणिकपणे व्यवसाय कसा करावा, याची शिकवण डॉ. बेहराम यांनी दिली. त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन," असेही त्यांनी सांगितले.
*चार पिढ्यांची सेवा... १०६ वर्षीय न्यूमोनियाग्रस्त रुग्णाला बरे करण्याचे समाधान*
वैद्यकीय व्यवसायातील संस्मरणीय अनुभव सांगताना डॉ. राऊत म्हणाले, "मला चार पिढ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. धनेशभाई वर्तक यांच्या १०६ वर्षीय आईला गेल्या वर्षी न्यूमोनिया झाला होता. त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करण्याची संधी मिळाली. त्याचे मला आजही विशेष समाधान वाटते."
सायकल हा केवळ एका दिवसाचा उपक्रम न ठेवता ती जीवनशैली बनवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
*'पाचबत्ती' नव्हे... 'हुतात्मा चौक' म्हणा*
आपल्या भाषणात डॉ. राऊत यांनी पालघरच्या इतिहासाशी जोडलेला एक महत्त्वाचा मुद्दाही मांडला.
"हुतात्मा चौकाला 'पाचबत्ती' म्हणू नका," असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, १४ ऑगस्ट १९४२ रोजी येथे पाच हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. नांदगाव तर्फे तारापूर येथील हुतात्मा गणेश ठाकूर यांनी आपल्या वडिलांच्या मांडीवर प्राण सोडल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यांचे वडील पालघर तालुका काँग्रेसचे सचिव होते. ते जिवंत असताना कोणीही 'पाचबत्ती' असा उल्लेख केला की ते नाराज होत आणि "पाचबत्ती नाही, हुतात्मा चौक" असे आग्रहाने सांगत असत. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचा उल्लेख हुतात्मा चौक असाच करावा, असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
*सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मैफल*
कार्यक्रमात आनंद वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच ऋतुजा नृत्यालयाच्या कलाकारांनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची झलक दाखविणारा बहारदार नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता डांगे आणि डॉ. संजय डांगे यांनी केले. मानपत्राचे वाचन निनाद सावे आणि माधवी उलकंदे यांनी केले.
यावेळी रोटरी क्लबचे सचिव अमित पाटील, रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मिलिंद उलकंदे, असिस्टंट गव्हर्नर जयेश आव्हाड, इनरव्हील क्लबच्या सचिव मृदुला सावे, जिल्हा शल्यविशारद डॉ. रामदास मराड यांच्यासह रोटरी व इनरव्हील परिवारातील सदस्य, पालघर तालुक्यातील वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.