नवयुग पालघर
**🗳️ विशेष मतदार पुनरीक्षणात कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करा**
*केंद्रस्तरीय अधिकाऱ्यां,"ना (BLO) सूचना ;
जिल्ह्यात प्रगणक नमुना वाटप २७.६५ टक्के पूर्ण*
📌 ठळक मुद्दे
प्रगणक नमुना (EF) वाटप : २७.६५%
सर्वाधिक प्रगती : विक्रमगड – ८८%
सर्वात कमी प्रगती : नालासोपारा – २%
अतिवृष्टीमुळे वसई, नालासोपारा, बोईसरमध्ये कामावर परिणाम
घराघरात जाऊनच नमुने भरून घेण्याच्या सूचना
राजकीय पक्षांच्या शिबिरांमध्ये काम करण्यास मनाई
दिरंगाई किंवा निष्काळजीपणा केल्यास कारवाईचा इशारा
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात ३० जूनपासून सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करावे..कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, टाळाटाळ किंवा दिरंगाई केल्यास संबंधितांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिला आहे. कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी घराघरात जाऊन प्रगणक नमुना वाटप, भरलेले नमुने स्वीकारणे, पडताळणी आणि नोंदींचे जुळवणीचे काम नियमानुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या जिल्ह्यात मतदारांकडून प्रगणक नमुना (Enumeration Form) भरून घेण्याचे काम सुरू असून, आजअखेर २७.६५ टक्के नमुन्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगतीमध्ये विक्रमगड ८८ टक्के, पालघर ६१ टक्के, डहाणू ३९ टक्के, बोईसर ८ टक्के, वसई ७ टक्के आणि नालासोपारा २ टक्के अशी स्थिती आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांतील अतिवृष्टीमुळे तसेच वसई, विरार, नालासोपारा परिसरात पाणी साचल्याने बोईसर, नालासोपारा आणि वसई मतदारसंघातील पुनरीक्षणाचे काम अपेक्षित गतीने होऊ शकले नाही. परिस्थिती पूर्ववत होताच या भागांतील कामाला अधिक वेग देण्यात येणार आहे.
*मतदार केंद्रस्थानी; घरपोच सेवेला प्राधान्य*
विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेट देऊन प्रगणक नमुने वाटणे, भरलेले नमुने स्वीकारणे, पडताळणी करणे आणि नोंदींची जुळवणी करणे ही सर्व कामे आयोगाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यावर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
*राजकीय पक्षांच्या शिबिरांमध्ये काम करण्यास मनाई*
विशेष पुनरीक्षण मोहिमेबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि केंद्रस्तरीय अधिकारी यांना स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी शिबिरे भरवून नमुने स्वीकारणे तसेच राजकीय प्रतिनिधींच्या सूचनेनुसार काम होत असल्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती.
यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या शिबिरात किंवा कॅम्पमध्ये तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी किंवा इतर व्यक्तीच्या निर्देशानुसार अथवा दबावाखाली पुनरीक्षणाशी संबंधित कोणतेही काम करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. संपूर्ण कामकाज केवळ भारत निवडणूक आयोगाच्या नियम, मार्गदर्शक सूचना आणि निर्देशांनुसारच पार पाडावे, असे प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व नागरिक, राजकीय पक्ष तसेच मतदान केंद्र प्रतिनिधी (बीएलए) यांनी विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
📊 विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगती
विक्रमगड
८८%
पालघर
६१%
डहाणू
३९%
बोईसर
८%
वसई
७%
नालासोपारा
२%
जिल्हा सरासरी
२७.६५%