***पावसाचं थैमान सुरू असतानाच धरणाची गळती थांबविण्याची शर्यत!

Date: 2026-07-11
news-banner

नवयुग पालघर

***पावसाचं थैमान सुरू असतानाच धरणाची गळती थांबविण्याची शर्यत!
      भर पावसात १०० मजूर, जेसीबी आणि हजारो पोत्यांनी थांबवली झांजरोली धरणाची गळती; आता धोका टळला, स्थलांतरित कुटुंबे परतली घरी***

                पावसाने थैमान घातलेले... धरण १०० टक्के भरलेले... खालच्या बाजूच्या उतारावरील तब्बल २० मीटर × ३५ मीटर परिसरातील माती-दगडी पिचिंग कोसळलेले... आणि धरणाखालील गावांवर संभाव्य पूरस्थितीचे संकट! अशा अत्यंत बिकट परिस्थितीत जलसंपदा विभाग, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने अक्षरशः जीवाची बाजी लावत दिवस-रात्र काम करून झांजरोली (केळवा) धरण सुरक्षित केले. आता धरणावरील तातडीची दुरुस्ती पूर्ण झाली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारी म्हणून स्थलांतरित करण्यात आलेली २८६ कुटुंबेही आपल्या घरी परतली आहेत.

                 माहीम-केळवे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेले हे धरण पालघर तालुक्यातील झांजरोली गावाजवळ असून, केळवे-सफाळे परिसरातील सुमारे १९ गावांच्या नळपाणी पुरवठ्यासह सिंचनासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. ३.२४२ दशलक्ष घनमीटर जलसाठा क्षमता असलेल्या या धरणामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेतीला पाणी मिळते. 

नेमके काय घडले होते?

            ६ जुलै रोजी परिसरात ३५० मिमीपेक्षा अधिक मुसळधार पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. वाढत्या पाण्यामुळे सांडव्यातून २,९५१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. याचवेळी धरणाच्या पश्चिमेकडील खालच्या उतारावर सतत पडणाऱ्या पावसामुळे रेन कट्स निर्माण झाले आणि २० मीटर × ३५ मीटर परिसरातील माती-दगडी संरक्षक पिचिंग ढासळले. त्यामुळे धूप वाढून धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

            धरणाखालील मंडळपाडा, देवशेतपाडा, तरडेपाडा, देवीपाडा, सांबरदहाड पाडा, डोंडलपाडा, पाटीलपाडा, पठारीपाडा तसेच इतर गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने स्थलांतर मोहीम सुरू केली. एकूण २८६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आणि एनडीआरएफची टीमही घटनास्थळी तैनात करण्यात आली.

          भर पावसात अशी केली धरणाची 'लाईफ सेव्हिंग' दुरुस्ती
               धरणावरील धोका वाढत असतानाच ६ आणि ७ जुलै रोजी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, उप अभियंता गिरी व त्यांच्या चमूने युद्धपातळीवर बचाव आणि दुरुस्तीचे काम सुरू केले . १०० मजूर, ३ जेसीबी, ५ पिकअप, २ टिप्पर आणि २ जनरेटर यांच्या मदतीने ढासळलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर माती, खडी आणि वाळूने भरलेली पोती टाकून धूप थांबविण्यात आली. सततच्या पावसातही काम न थांबवता यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत राहिली.

           ८ आणि ९ जुलै रोजी उर्वरित काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर धरण सुरक्षितता संघटना (DSO), नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरूपी संरक्षणात्मक कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

        जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी

          घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक, महसूल, जलसंपदा, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची संपूर्ण यंत्रणा सतत घटनास्थळी तैनात होती. धरणातील पाण्याची पातळी, विसर्ग आणि दुरुस्तीच्या कामांवर सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळी भेट देऊन आवश्यक सूचना केल्या.

धोका टळला; कायमस्वरूपी उपाययोजना होणार

          सध्या तातडीची दुरुस्ती पूर्ण झाल्याने धरण सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. खबरदारी म्हणून स्थलांतरित केलेली सर्व कुटुंबे आपल्या घरी परतली आहेत. मात्र भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी धरण सुरक्षितता संघटनेच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरूपी मजबुतीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत.

               झांजरोली धरणावरील ही घटना मोठ्या संकटाची चाहूल देणारी ठरली असली, तरी प्रशासन, अभियंते, मजूर आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तातडीच्या आणि समन्वित प्रयत्नांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना आणि पूरस्थिती टळल्याची भावना परिसरात
व्यक्त होत आहे.

Leave Your Comments