****पालकमंत्री आणि गावितांच्या जनता दरबारात तीनदा अर्ज, तरीही दखल नाही; केळव्यातील देवीपाडा पुन्हा जलमय**** **नागरिकांचा आरोप : भुयारी गटाराच्या मागणीकडे दुर्लक्ष; अतिवृष्टीत आदिवासी कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त**

Date: 2026-07-09
news-banner

नवयुग पालघर 

****पालकमंत्री आणि गावितांच्या जनता दरबारात तीनदा अर्ज, तरीही दखल नाही; 
केळव्यातील देवीपाडा पुन्हा जलमय****
**नागरिकांचा आरोप : भुयारी गटाराच्या मागणीकडे दुर्लक्ष; अतिवृष्टीत आदिवासी कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त**

              केळवे, प्रतिनिधी : केळवे परिसरातील देवीपाडा, नारतळे, वर्तक पाखाडी, कौलघर आदी भागात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. केळवे देवीपाडा येथून समुद्रापर्यंत भुयारी गटार उभारून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी नागरिकांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात तब्बल तीन वेळा आणि आमदार राजेंद्र गावित यांच्या जनता दरबारात एकदा अर्जाद्वारे केली होती. मात्र, या अर्जांची दखल न घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच दुर्लक्षामुळे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत देवीपाडा परिसर जलमय झाला असून अनेक आदिवासी कुटुंबांच्या घरात पूराचे पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

             नागरिकांच्या म्हणण्यानुसार, समुद्रालगत असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचते. मात्र समुद्र जवळ असूनही पाण्याचा निचरा होण्यासाठी स्वतंत्र मार्ग नसल्याने दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून देवीपाडा ते समुद्रकिनारा असा भुयारी निचरा मार्ग (ड्रेनेज) उभारण्याची मागणी करण्यात आली होती.

             नागरिकांचा आरोप आहे की, जनता दरबारात अर्ज सादर करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, अतिवृष्टीनंतर पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने देवीपाडा परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. अनेक आदिवासी कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची मोठी नासाडी झाली. काही घरांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
पूराचा फटका केवळ देवीपाड्यापुरता मर्यादित राहिला नाही. नारतळे, वर्तक पाखाडी आणि कौलघर परिसरातील घरांमध्येही पाणी शिरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या भागातील सर्व प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

            "जनता दरबारात वारंवार अर्ज करूनही न्याय मिळत नसेल, तर आता न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची?" असा संतप्त सवाल पूरग्रस्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

            दरम्यान, केळवे देवीपाडा ते समुद्र असा भुयारी गटार प्रकल्प तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

Leave Your Comments