***घर पाण्याखाली... छतावर मृतदेह... चार तास मृत्यू आणि पुराशी झुंज!*** *केळवे रोडच्या देवीपाड्यातील हृदयद्रावक घटना; स्मशान जलमय झाल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार*

Date: 2026-07-13
news-banner

नवयुग पालघर
***घर पाण्याखाली... छतावर मृतदेह... चार तास मृत्यू आणि पुराशी झुंज!***
*केळवे रोडच्या देवीपाड्यातील हृदयद्रावक घटना; स्मशान जलमय झाल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार*

पालघर | प्रतिनिधी

             पूर म्हणजे फक्त घरांचे, रस्त्यांचे किंवा शेतीचे नुकसान नव्हे; तो माणसाच्या असहाय्यतेचाही चेहरा दाखवतो. पालघर जिल्ह्यातील केळवे रोड येथील देवीपाड्यात घडलेली एक घटना याच वास्तवाची अंगावर शहारे आणणारी साक्ष ठरली. मुसळधार पावसाने गाव चारही बाजूंनी पाण्याने वेढले असताना एका कुटुंबाला आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृतदेहासह तब्बल चार तास घराच्या पत्र्यावर आश्रय घ्यावा लागला. दुःख, भीती आणि असहाय्यता यांचा हा क्षण उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.

            देवीपाड्यातील अनुसया मनोहर (लिलका) (५५) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. सोमवारी पहाटे रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह घरी आणला जात असताना केळवे रोड रेल्वे भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. अखेर नातेवाईकांनी मृतदेह खांद्यावर घेत गुडघाभर ते कमरेपर्यंत पाण्यातून वाट काढत घर गाठले.
              परंतु घरी पोहोचताच संकट आणखी गडद झाले. मुसळधार पावसामुळे काही मिनिटांतच पुराचे पाणी घरात घुसले आणि पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली. मृतदेह पाण्यात वाहून जाण्याची भीती निर्माण झाल्याने कुटुंबीयांनी धाडस करून घराच्या छतावरील सिमेंटचे पत्रे काढले आणि मृतदेह वर नेला. प्लास्टिकने झाकून तो सुरक्षित ठेवण्यात आला. त्यानंतर लहान मुले, महिला आणि इतर नातेवाईकही त्याच पत्र्यावर आश्रय घेऊन बसले. खाली उसळणारा पूर आणि वर आप्तस्वकीयाच्या निधनाचे दुःख—या दुहेरी आघातात हे कुटुंब चार तास अडकून पडले.

                दरम्यान, संपूर्ण देवीपाडा चार ते पाच फूट पाण्याखाली गेल्याने स्थानिक स्मशानभूमीही जलमय झाली होती. त्यामुळे अंत्यसंस्कार करणे अशक्य झाले. तातडीची मदत पोहोचण्यासही विलंब होत असल्याने कुटुंबीयांची असहाय्यता अधिकच वाढली.

             अखेर काही तासांनी पाण्याचा वेग आणि पातळी कमी झाल्यानंतर मृतदेह खाली आणण्यात आला. ग्रामस्थांनी तातडीने पुढाकार घेत लाकूड व इतर आवश्यक साहित्याची व्यवस्था केली. स्मशानभूमी वापरणे शक्य नसल्याने जवळच्या मोकळ्या जागेतच पाणी ओसरत असताना अत्यंत साध्या परिस्थितीत अनुसया लिलका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 त्या चार तासांत........

🔹 धुंदलवाडी रुग्णालयात उपचारादरम्यान ५५ वर्षीय
अनुसया लिलका यांचे निधन

🔹 रेल्वे अंडरपास पाण्याखाली; रुग्णवाहिका अडकली

🔹 मृतदेह खांद्यावरून पाण्यातून घरी आणावा लागला

🔹 घरात पुराचे पाणी शिरताच मृतदेह छतावर हलवला

🔹 कुटुंबीय चार तास पत्र्यावर अडकून पडले

🔹 स्मशानभूमी जलमय; मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार



Leave Your Comments