युवक बिरादरी (भारत) आणि पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “व्यक्तिमत्त्व, नेतृत्व व दायित्व” या पाच दिवसीय अनिवासी कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दि. २५ ते ३० जून २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या कार्यशाळेत पालघर जिल्ह्यातील सुमारे दहा महाविद्यालयांतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
युवकांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, लोकशाही मूल्ये आणि जबाबदारीची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्र विद्यार्थ्यांच्या वैचारिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे ठरले.
कार्यशाळेच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचा सहभाग आणि उत्साह उल्लेखनीय होता. प्रा. स्वर क्रांती यांनी नेतृत्व या विषयावर मार्गदर्शन करत प्रभावी नेतृत्वासाठी आवश्यक असलेले संवादकौशल्य, निर्णयक्षमता आणि समूह व्यवस्थापन यावर भाष्य केले. डॉ. गरिमा पाल यांनी “बदल घडवणारे तरुण” या विषयावर बोलताना समाजपरिवर्तनात युवकांची भूमिका अधोरेखित केली.
आर्थिक साक्षरतेच्या सत्रात वसंत कुलकर्णी यांनी बचत, गुंतवणूक, आर्थिक नियोजन आणि भविष्यातील आर्थिक स्वावलंबन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. हुबनाथ पांडे यांनी साहित्यस्वादाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती आणि साहित्यिक दृष्टिकोन यांचे महत्त्व स्पष्ट केले.
विश्वनाथ फाळेगावकर यांनी शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर, त्याचे फायदे, आव्हाने आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीत तंत्रज्ञानाचा उपयोग यावर सखोल चर्चा केली. राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांनी “राजकीय आव्हाने आणि भारत” या विषयावर विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत देशातील बदलते राजकीय वास्तव, लोकशाहीची आव्हाने आणि जबाबदार नागरिकत्व यावर विचार मांडले.
निहार देवरुखकर यांनी बंदर उद्योग क्षेत्रातील वाढत्या रोजगारसंधी आणि नेतृत्व मूल्यांची गरज यावर भाष्य केले. ॲड. वेदांत माईणकर यांनी माहितीचा अधिकार आणि ग्राहक हक्कांविषयी मूलभूत माहिती देत कायदेशीर साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यशाळेतील एक विशेष आकर्षण म्हणजे डॉ. रविदास गावित यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेली अभिरूप युवा संसद. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. चर्चासत्र, प्रश्नोत्तर आणि निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेचे प्रत्यक्ष स्वरूप समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
याशिवाय एक सूर एक ताल टीमने विद्यार्थ्यांना नृत्य आणि गायनाचे प्रशिक्षण देत त्यांच्या कलागुणांना वाव दिला. डॉ. मृदुल नीळे यांनी धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया आणि संसदीय व्यवस्थेची मूलभूत माहिती स्पष्ट केली. डॉ. भालचंद्र कुबल यांच्या नाट्य कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती कौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा विकास झाला.
प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ राम चढढा
यांनी निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. शिक्षणाबरोबरच आरोग्य, संस्कार, सामाजिक दायित्व आणि नेतृत्व या सर्व अंगांचा समतोल विकास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे प्रकल्प समन्वयक हृषिकेश गोखले यांनी संपूर्ण उपक्रमाचे प्रभावी नियोजन व समन्वय यशस्वीपणे सांभाळला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ, डॉ. महेश देशमुख आणि प्रा. विवेक कुडू यांनी सहकार्य केले.
तसेच कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रोहित गायकवाड, प्रा. गौतम तरे, प्रा. रेणू दुबे आणि प्रा. भक्ती आरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतून नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, लोकशाही मूल्ये, वैचारिक समृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकासाची नवी दृष्टी मिळाल्याची भावना व्यक्त केली.