****दापचरीत १,३९५ एकरांवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराची तयारी; मंत्री जयकुमार रावल यांची प्रकल्पस्थळी पाहणी****
पालघर, दि. १९ : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे १,३९५ एकर जमिनीवर प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्पाच्या जागेची पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. फ्रान्समधील रुंगीस मार्केटच्या धर्तीवर अत्याधुनिक कृषी व्यापार केंद्र उभारण्याचा राज्य शासनाचा मानस असून, या प्रकल्पामुळे देशातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याबरोबरच पालघर परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा दावा रावल यांनी यावेळी केला
.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी सुभाष भागडे, बाबासाहेब थोरात, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शैलेश सावंत, डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी, उपनिबंधक किसन रत्नाळे, झेन्मार्क सर्व्हे प्रा. लि.चे रुपेश राणे, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
मंत्री रावल यांनी गोशाळा परिसर, गोहर धाड कृषी विभाग आणि नवा मोहरा कृषी विभागासह विविध भागांना भेट देत प्रकल्पाच्या उभारणीच्या दृष्टीने जागेची माहिती घेतली. प्रकल्पाची पुढील प्रक्रिया गतीने पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
पाहणीनंतर बोलताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल एका मोठ्या आणि आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याची शासनाची योजना आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून येणाऱ्या कृषी उत्पादनांसाठी येथे बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले .
या केंद्रात फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले, मासे, दुग्धजन्य पदार्थ, मांस तसेच प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांसाठी आधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. कृषीमालाची खरेदी-विक्री, प्रक्रिया, पॅकिंग, साठवणूक, कोल्ड स्टोरेज, वाहतूक आणि निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली.
*लॉजिस्टिक्स हब म्हणून विकासाची योजना*
वाढवण बंदर, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि भविष्यातील विमानतळाशी होणारी जोडणी या प्रकल्पासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे रावल यांनी सांगितले. वाढवण डीपवॉटर पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि वडोदरा एक्स्प्रेस वे यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांशी जोडणी झाल्यास दापचरी परिसर एकात्मिक बहुविध वाहतूक कृषी केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो,असेही ते म्हणाले.
या जोडणीमुळे कृषीमालाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाहतूक सुलभ होईल. निर्यात प्रक्रियेला गती मिळून वाहतूक व इतर खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे. फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला या प्रकल्पातून चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
*स्थानिकांसाठी सुमारे १० हजार रोजगाराच्या संधी*
या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांसाठी कृषी प्रक्रिया उद्योग, गोदामे, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक्स, पॅकिंग, वाहतूक आणि इतर पूरक सेवांमध्ये सुमारे १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असून, स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांना सध्या मालाच्या विक्रीसाठी मुंबई किंवा वाशीपर्यंत जावे लागते. दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी बाजारपेठ उभी राहिल्यास स्थानिक उत्पादकांना जवळच विक्रीची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यासह उत्पादकांना चांगली बाजारपेठ मिळण्याची शक्यता असल्याचे रावल यांनी सांगितले.
*विस्थापन होणार नसल्याचे आश्वासन*
या प्रकल्पासाठी कोणाचेही विस्थापन केले जाणार नाही, असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून पडून असलेल्या सरकारी जमिनीचा नियोजित विकास करून हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.