उमरोळीच्या तलावात जलपूजनातून माती आणि पाण्याचे नाते जपण्याचा संकल्प; तलाव परिसरात वृक्षारोपण

Date: 2026-08-20
news-banner

***उमरोळीच्या तलावात जलपूजनातून
माती आणि पाण्याचे नाते जपण्याचा संकल्प; तलाव परिसरात वृक्षारोपण****

पालघर, दि. २० : पाणी हा केवळ वापराचा विषय नसून भविष्यातील पिढ्यांसाठी जपून ठेवण्याची संपत्ती आहे आणि माती ही शेती व पर्यावरणाचा आधार आहे. या दोन्ही नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन केल्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही, हा संदेश उमरोळी येथील गावतलावाच्या जलपूजनातून देण्यात आला. मृद व जलसंधारण सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद पालघर आणि ग्रामपंचायत उमरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

राज्यात १५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत मृद व जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात पाणी आणि मातीच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा, 'एक शाळा - एक शोषखड्डा', मृद व जलसंधारण कामांचे लोकार्पण, जलपूजन आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांद्वारे जलसंवर्धनाचा विचार समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उमरोळी येथील गावतलावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. गावाच्या जलस्रोताविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्याचे संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आली. यानंतर तलाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जलस्रोतांचे संरक्षण आणि परिसरातील हरितावरण वाढविण्याचा दुहेरी उद्देश या उपक्रमामागे होता.

यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप पाडवी यांनी मृद व जलसंधारण अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे जतन करणे, यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उमरोळीचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी गावात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली. या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य, विविध मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी उमरोळी ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेतला. पंतप्रधान आवास योजना, ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वितरण तसेच शिक्षण आणि आरोग्य सुविधांबाबत उपस्थितांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.



Leave Your Comments