पालघरकरांची ‘वॉक फॉर वॉटर’ : तीन किलोमीटरच्या महावॉकेथॉनमधून पाणी बचत, मृदसंवर्धन आणि लोकसहभागाचा निर्धार

Date: 2026-08-23
news-banner

नवयुग पालघर
***पालघरकरांची ‘वॉक फॉर वॉटर’ :
तीन किलोमीटरच्या महावॉकेथॉनमधून पाणी बचत, मृदसंवर्धन आणि लोकसहभागाचा निर्धार ***

पालघर, दि. २१  : “पाण्याचा प्रत्येक थेंब जपूया, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया” हा संदेश घेऊन पालघर शहरात जलसंधारण दिनानिमित्त आयोजित  **महावॉकेथॉन – ‘वॉक फॉर वॉटर’**ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा यामध्ये सहभाग लाभला.

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त या तीन किलोमीटरच्या महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलसाठे वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे जतन करणे, या उद्देशाने सहभागी नागरिकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
महावॉकेथॉनला पालघर येथील हुतात्मा स्तंभापासून प्रारंभ झाला. माहीम रोडमार्गे स्वामी समर्थ मठापर्यंत मार्गक्रमण केल्यानंतर सहभागी पुन्हा माहीम रोडने हुतात्मा स्तंभाजवळ परतले. हातात जलसंवर्धनाचे संदेश देणारे फलक आणि घोषणांच्या माध्यमातून नागरिकांनी पाणी बचतीचा जागर केला.

या उपक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता फरीद खान, उपजिल्हाधिकारी विजया जाधव, उपविभागीय अधिकारी (मृद व जलसंधारण) संजय कचरे, ओमकार खोरगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, एमजीपीचे कार्यकारी अभियंता अजय मुळे तसेच जलसंधारण अधिकारी रवींद्र कोती यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.

पाण्याची बचत ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यात योगदान देणे आवश्यक असल्याचा संदेश या महावॉकेथॉनमधून देण्यात आला. माती आणि पाण्याचे संवर्धन करून भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षित महाराष्ट्र उभारण्याचा सामूहिक निर्धारही यावेळी सहभागी नागरिकांनी व्यक्त केला.

Leave Your Comments