५०० कामगारांच्या कथित कपातीचा प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित; दोन हजारांहून अधिक कामगारांचा कामगार उपायुक्त कार्यालयावर धडक मोर्चा*** *उमराळी रेल्वे स्थानक ते पालघर कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी; विराज प्रोफाइल्स व्यवस्थापन आणि कामगार प्रशासनाविरोधात

Date: 2026-08-23
news-banner

नवयुग पालघर
***५०० कामगारांच्या कथित कपातीचा प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित; दोन हजारांहून अधिक कामगारांचा कामगार उपायुक्त कार्यालयावर धडक मोर्चा***
*उमराळी रेल्वे स्थानक ते पालघर कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी; विराज प्रोफाइल्स व्यवस्थापन आणि कामगार प्रशासनाविरोधात गंभीर आरोप*

पालघर, दि. १९ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाइल्स कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत मुंबई लेबर युनियनच्या नेतृत्वाखाली दोन हजारांहून अधिक कामगारांनी बुधवारी पालघर येथील कामगार उपायुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. उमराळी रेल्वे स्थानकापासून कामगार उपायुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो कामगार सहभागी झाले होते. यावेळी विराज प्रोफाइल्स कंपनीचे व्यवस्थापन तसेच कामगारांच्या प्रश्नांवर कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुंबई लेबर युनियनच्या आरोपानुसार, २०२२ मध्ये विराज प्रोफाइल्समधील सुमारे ५०० कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले. अचानक झालेल्या या कथित कपातीमुळे शेकडो कामगारांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणात सुरुवातीला सर्व कामगारांच्या वतीने एकत्रित तक्रार कामगार उपायुक्त कार्यालयाकडे दाखल करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणे पुढे करून ही तक्रार नाकारण्यात आल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे.
त्यानंतर मुंबई लेबर युनियनच्या माध्यमातून या ५०० कामगारांच्या स्वतंत्र अशा ५०० तक्रारी दाखल करण्यात आल्या. मात्र, इतकी प्रकरणे दाखल होऊनही अद्याप एकाही प्रकरणात कंपनी व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. २०२२ पासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अद्याप ठोस कार्यवाही अथवा तोडगा निघालेला नसल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी असल्याचे यावेळी दिसून आले.

कामगारांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याऐवजी प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवली जात आहेत, असा आरोप मुंबई लेबर युनियनचे सचिव सदानंद प्रभू यांनी केला. कंपनी व्यवस्थापनाची बाजू घेत कामगारांच्या प्रश्नांवर पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या कार्यालयाकडूनच न्याय मिळत नसल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, विराज प्रोफाइल्सच्या विविध युनिटमधील कामगारांनी आंदोलनाला पाठिंबा देत काम बंद आंदोलनातही सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. हजारोंच्या संख्येने कामगार रस्त्यावर उतरल्याने २०२२ पासून रखडलेला विराज प्रोफाइल्समधील कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मोर्चादरम्यान कामगारांची ओळख पटविण्यासाठी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणारी पडताळणी हाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. या पद्धतीबाबत कामगारांनी आक्षेप नोंदविल्यानंतर यापुढे अशा प्रकारे कामगारांची ओळख पडताळणी केली जाणार नाही, अशी ग्वाही कामगार उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्याचे सदानंद प्रभू यांनी सांगितले.

“व्यवस्थापनाच्या सांगण्यावरून कामगारांवर अन्याय होत असल्याचा आमचा आरोप होता. हा प्रकार तूर्तास थांबविण्याची ग्वाही मिळाली आहे. मोर्चाचे हे महत्त्वाचे फलित आहे,” असे प्रभू यांनी सांगितले. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून २०२२ पासून प्रलंबित असलेल्या कामगारांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेऊन न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
कामगारांच्या प्रलंबित तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून योग्य तोडगा काढण्यात आला नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही मुंबई लेबर युनियनच्या वतीने देण्यात आला. गरज पडल्यास कामगारांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनाही आंदोलनात उतरावे लागेल, असे सांगत कामगारांच्या संयमाचा अंत पाहू नका; न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave Your Comments