मासवण (चहाडे) आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; २७ विद्यार्थी प्राथमिक आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली**** **ताप, सर्दी-खोकल्याची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची खबरदारी म्हणून तपासणी; प्रकल्प अधिकारी, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तातडीच्या भेटी**

Date: 2026-08-25
news-banner
https://youtu.be/gzSVwWw3HT0?si=S3I6SCD_BTH-rn6D
नवयुग पालघर
****मासवण (चहाडे) आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; २७ विद्यार्थी प्राथमिक आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली****
**ताप, सर्दी-खोकल्याची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची खबरदारी म्हणून तपासणी; प्रकल्प अधिकारी, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तातडीच्या भेटी**

पालघर, दि. २५ : तालुक्यातील मासवण (चहाडे) येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कुमार श्रीयांश शैलेश आंबात याचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. विद्यार्थ्याला ताप आल्याने यापूर्वी उपचारासाठी मासवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. दरम्यान, शाळेतील इतर काही विद्यार्थ्यांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सध्या २७ विद्यार्थ्यांना (१२ मुली,१५ मुलगे) मासवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

कुमार श्रीयांश आंबात याला २२ ऑगस्ट रोजी ताप आल्याने मासवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी पुन्हा ताप आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मनोर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून ईसीजी केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

मासवण (चहाडे) येथील आश्रमशाळेत एकूण ४४९ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये २२२ मुले आणि २२७ मुलींचा समावेश आहे. यापैकी ३९५ विद्यार्थी निवासी आहेत. विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या तातडीच्या सुधारणा आणि उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
यानंतर तालुका आश्रमशाळा पथकाने शाळेची सविस्तर तपासणी केली. तपासणीदरम्यान सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी १२ मुली आणि १५ मुली अशा विद्यार्थिनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्या असून, एक विद्यार्थिनी यापूर्वीपासून तीन दिवस उपचार व निरीक्षणाखाली आहे. सध्या एकूण २८ विद्यार्थी प्राथमिक आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणूचे प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी तातडीने मासवण आश्रमशाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन निरीक्षणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची भेट घेऊन चर्चा केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आश्रमशाळेत पुन्हा आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच परिसराची स्वच्छता आणि पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक उपाययोजना संस्थेकडून करून घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अशा  घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सर्व आवश्यक ती काळजी आणि खबरदारी घेतली जाईल, असेही प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी स्पष्ट केले.

Leave Your Comments