सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्या अमिता जयराज राऊत यांचे निधन

Date: 2026-09-01
news-banner

नवयुग पालघर 
**सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्या अमिता जयराज राऊत यांचे निधन**

पालघर : सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्र आणि विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागातून आपली  ओळख निर्माण करणाऱ्या  अमिता जयराज राऊत(६९) यांचे १७ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने पालघर परिसरातील एक संवेदनशील,  समाजाशी घट्ट नाते जपणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

१९ एप्रिल १९५७ रोजी जन्मलेल्या अमिता राऊत यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा, नवली येथे, माध्यमिक शिक्षण आर्यन हायस्कूल, पालघर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात झाले. त्या बी.ए. पदवीधर होत्या.

शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राशी त्यांचे दीर्घकाळचे नाते होते. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी व व्यवस्थापक मंडळाच्या सदस्या तसेच महिला समितीच्या सदस्या म्हणून त्यांनी काम केले. आर्यन एज्युकेशन सोसायटी, पालघर, विधी महाविद्यालय, प्राथमिक विभाग, इंग्रजी माध्यम आणि नवली येथील जि. प. शाळेच्या विविध समित्यांमध्येही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या.

पालघर पोलीस स्टेशन व रेल्वे पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीच्या सदस्या म्हणून त्यांनी काम केले. तसेच वनिता महिला मंडळ, नवली आणि कुणबी समाजोन्नती संघ, पालघरच्या त्या माजी अध्यक्षा व कार्यकारिणी सदस्या होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य समिती, जिल्हा प्रदूषण निवारण मंडळ तसेच विठ्ठल रखुमाई देवस्थान, नवली येथील जीर्णोद्धार समितीच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी योगदान दिले.

आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पीडित महिला व गरजू व्यक्तींना मदत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीही त्या पुढाकार घेत असत. बचतगट व महिला मंडळांच्या स्थापनेसाठी त्यांनी सहकार्य केले. 

पोहणे, फोटोग्राफी, रंगभूषा, कराटे, चित्रकला, सजावट, पर्यटन आणि बागकाम हे त्यांचे छंद होते. त्या श्वानप्रेमीही होत्या. आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत त्यांना रशियन संस्थेकडून पारितोषिक मिळाले होते. शालेय व महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक बक्षिसे मिळविली होती. सिव्हिल डिफेन्स आणि अग्निशमन क्षेत्रातील विविध उपक्रमांतही त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी खादीचा स्वीकार केला होता. दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने नवली येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यातही त्यांचा सहभाग असे.
आई दिवंगत माणकाताई चिंतामण पाटील, वडील दिवंगतचिंतामण नारायण पाटील आणि मामा दिवंगत डॉ. स. दा. वर्तक यांच्याकडून त्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली. शिस्त, स्वच्छता, स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा त्यांचा स्वभाव होता.त्यांचे  राजकारणापलीकडे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध होते.

त्यांचे पती दिवंगत जयराज भास्कर राऊत हे कमर्शियल आर्टिस्ट होते. त्यांचे सुमारे १७ वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर अमिता राऊत यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या पश्चात  मोठा मुलगा हिमांशू आणि धाकटा मुलगा चिन्मय असा परिवार आहे.

अमिता राऊत यांच्या निधनाने पालघरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि महिला चळवळीतील एक सक्रिय व व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave Your Comments