मोकाट गुरांच्या मालकांना दोन दिवसांची मुदत; ८ सप्टेंबरच्या रात्रीपासून मोकाट गोवंश ताब्यात घेणार**मोकाट गुरांमुळे होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा परिषदेची विशेष मोहीम

Date: 2026-09-03
news-banner

नवयुग पालघर
****मोकाट गुरांच्या मालकांना दोन दिवसांची मुदत; 
८ सप्टेंबरच्या रात्रीपासून मोकाट गोवंश ताब्यात घेणार****
**मोकाट गुरांमुळे होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा परिषदेची विशेष मोहीम**

पालघर, दि. ३ सप्टेंबर : रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गायी-बैलांमुळे होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेत पालघर जिल्हा परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रशासन, गोशाळा, गोरक्षक, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) काम करणाऱ्या संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोकाट गोवंशाला सुरक्षित निवारा मिळवून देतानाच रस्त्यांवरील अपघातांना आळा घालणे हा मोहिमेचा उद्देश आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली गोरक्षक आणि गोशाळांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मोहिमेच्या नियोजनासह गोरक्षक आणि गोशाळांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.

मनोज रानडे यांनी मोकाट फिरणाऱ्या गोवंशाच्या मालकांना दोन दिवसांत आपली जनावरे ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे. गायी, बैल अथवा अन्य गोवंश मालकीचा असूनही रस्त्यावर मोकाट आढळल्यास संबंधित मालकांनी तातडीने त्यांची व्यवस्था करावी. दोन दिवसांनंतरही जनावरे रस्त्यावर मोकाट आढळल्यास प्रशासनामार्फत ती ताब्यात घेऊन संबंधित गोशाळांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
या मोहिमेची विशेष कारवाई मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी रात्री करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मोकाट गोवंशाची संख्या, गोशाळांमध्ये उपलब्ध जागा व त्यांची क्षमता, जनावरांच्या वाहतुकीची व्यवस्था आणि आवश्यक मनुष्यबळ यांचे नियोजन केले जाणार आहे. सीएसआर संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात मोकाट जनावरे वाहनांमध्ये भरून संबंधित गोशाळांमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात येणार आहेत.
बैठकीत गोरक्षकांनी मोहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भात विविध सूचना मांडल्या. गोरक्षक रात्रीच्या वेळी गोवंश ताब्यात घेण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांना अधिकृत ओळखपत्र किंवा बॅच देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेली जनावरे गोशाळेत दाखल केल्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदेशीर प्रकरणांमध्ये गोशाळांना अडचणी येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणीही करण्यात आली. या प्रक्रियेत होणारा खर्च प्रशासनाने करावा, अशी सूचनाही करण्यात आली.
गोवंशाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा रंग एकसारखा असावा, अशी सूचनाही गोरक्षकांनी केली. काही गोरक्षकांनी स्वखुशीने काही प्रमाणात गोवंश आपल्या देखरेखीखाली घेण्याची तयारी दर्शविली.
जिल्ह्यातील विविध भागांतून ताब्यात घेतल्या जाणाऱ्या जनावरांचे गोशाळांमध्ये नियोजनबद्ध स्थलांतर करण्याबाबतही बैठकीत प्राथमिक नियोजन करण्यात आले. पालघर-माहीम-बोईसर परिसरातील जनावरे देवखोप आणि वसई येथील गोशाळांकडे, तर आच्छाड-चारोटी परिसरातील जनावरे वापी येथील गोशाळेकडे पाठविण्याबाबत चर्चा झाली.
बैठकीस आदी घंटाकर्ण चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी व गोसेवक मनोज शहा, हमरापूर येथील पशुपती गोशाळेचे प्रतिनिधी केदार लेले, धुंदलवाडी येथील बहुला गोधाम गोशाळेचे प्रतिनिधी दामोदर दुलालदास, वाडा येथील श्रीराम दृष्टी गोशाळेचे प्रतिनिधी किशोर कराळे, देवखोप येथील गोशाळेचे प्रतिनिधी सुरेशभाई सावला, जिल्ह्यातील अन्य गोरक्षक तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांवर मोकाट गोवंशामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला निर्माण होणारा धोका कमी करण्याबरोबरच गोवंशाला सुरक्षित निवारा आणि आवश्यक देखभाल मिळावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आपल्या मालकीचा गोवंश रस्त्यावर मोकाट सोडू नये आणि प्रशासनाच्या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.
navyugpalghar.com
Facebook। YouTube । Instagram
#पालघर #पालघरजिल्हा #जिल्हापरिषद #मोकाटगोवंश #गोवंश #गोशाळा #रस्तेसुरक्षा #अपघात #विशेषमोहीम #Palghar #RoadSafety #NavyugPalghar

Leave Your Comments