विमानतळाच्या घोषणांपासून एसटीच्या मोडकळीस आलेल्या दारापर्यंत… ग्रामीण प्रवासी सेवेचे हे वास्तव कधी बदलणार?

Date: 2026-09-03
news-banner
****विमानतळाच्या घोषणांपासून एसटीच्या मोडकळीस आलेल्या दारापर्यंत… ग्रामीण प्रवासी सेवेचे हे वास्तव कधी बदलणार?****

मोखाडा, दि. २ सप्टेंबर : पालघर जिल्ह्यात विमानतळ उभारण्याच्या घोषणा होत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सार्वजनिक प्रवासी सेवेचे विदारक वास्तव समोर आले आहे. मोखाडा एसटी स्थानकावर २ सप्टेंबर रोजी जव्हार आगाराची बस चक्क मोडकळीस आलेल्या अवस्थेत दिसून आली. बसचा दरवाजा अक्षरशः तुटून खाली पडल्याचे छायाचित्रांत दिसत आहे.
 या घटनेत कोणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एका बाजूला पालघर जिल्ह्यात विमानतळासारख्या  प्रकल्पांच्या घोषणा होत आहेत; तर दुसऱ्या बाजूला मोखाडा, जव्हारसारख्या ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना साधी सुरक्षित आणि विश्वासार्ह एसटी सेवा मिळणेही आव्हान ठरत आहे.

एसटी बस ही ग्रामीण भागातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे. विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास मोठ्या प्रमाणावर एसटीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मोडकळीस आलेल्या बस रस्त्यावर धावत राहणे कितपत सुरक्षित? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय, परिवहन मंत्री महोदय, विमानतळाच्या घोषणांनी पाठ थोपटून घ्या; पण ग्रामीण पालघरच्या प्रवाशांना आधी सुरक्षित एसटी द्या!

मोडकळीस आलेल्या बस, तुटलेले दरवाजे आणि धोकादायक प्रवास याकडे गांभीर्याने पाहून जव्हार आगारासह ग्रामीण भागातील एसटी बसची तातडीने तपासणी करून जुन्या व असुरक्षित बस सेवेतून हटवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
विमानतळापर्यंत पोहोचण्याआधी ग्रामीण प्रवाशांचा प्रवास तरी सुरक्षित करा!

navyugpalghar.com
#नवयुगपालघर #पालघर #मोखाडा #जव्हार #एसटी #एसटीबस #प्रवासीसेवा #ग्रामीणप्रवासी #परिवहनमंत्री #मुख्यमंत्री #महाराष्ट्र #महाराष्ट्रएसटी #एसटीमहामंडळ #ग्रामीणमहाराष्ट्र #प्रवाशांचीसुरक्षा #STBus #Palghar #Mokhada #Jawhar #TransportMinister #CM #Maharashtra

Leave Your Comments