नवयुग पालघर
***जव्हार तालुक्याची ‘तालुका सर्वसमावेशक विकास प्रतिमान कार्यान्वित’***
जव्हार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा ‘एकात्मिक ग्राम विकास प्रकल्प २.०’ (घ्न्न्Dझ् २.०) मध्ये समावेश करून ‘तालुका सर्वसमावेशक विकास प्रतिमान कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त सहभागातून ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
‘लोक, सेवा, संधी, शाश्वत गाव’ या संकल्पनेवर आधारित एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पामध्ये गावांचा एकात्मिक विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. समुदाय नेतृत्व व ग्रामस्वराज्य, महिला सक्षमीकरण, आर्थिक क्षमता, आरोग्य व पोषण, शिक्षण, उपजीविका व कौशल्य विकास, गृहनिर्माण व सामाजिक सुविधा तसेच पर्यावरण व नैसर्गिक संसाधन संवर्धन या क्षेत्रांत काम केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी जव्हारसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींना एकाच वेळी विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शासकीय योजनांचा लाभ पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन, टाटा मोटर्स फाउंडेशन आणि स्थानिक समुदायाच्या समन्वयातून काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांनी स्थलांतर, कुपोषण आणि उपजीविका या तीन प्रमुख समस्यांवर या अंतर्गत काम केले जाणार असल्याचे सांगून विविध शासकीय योजनांचे अभिसरण करून ग्रामीण कुटुंबांना सर्वांगीण लाभ देणार असल्याचे नमूद केले.
जव्हारचे प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सिद्धार्थ रामकुमार यांनी ग्रामपंचायती, शासकीय यंत्रणा आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्या समन्वयाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. उप जिल्हाधिकारी विजया जाधव यांनी टाटा मोटर्स फाउंडेशन सोबत गेल्या दोन वर्षांत वाडी मॉडेल आणि शेततळे प्रकल्पांच्या माध्यमातून झालेल्या कामाचा अनुभव मांडला.
टाटा मोटर्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी हा प्रकल्प समुदाय सक्षमीकरणावर केंद्रित उपक्रम असल्याचे सांगितले. शासन, संस्था आणि समुदाय यांच्या समन्वयातून महाराष्ट्रातील अधिक गावांपर्यंत हा उपक्रम नेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान,कार्यक्रमात रोहयोअंतर्गत नांदगाव आणि ऐना ग्रामपंचायतीतील आठ लाभार्थी शेतकर्यांना बांबू, काजू, जांभूळ, आवळा व चिंच आदी रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच वैयक्तिक वनपट्ट्यांचे ७/१२ उतारेही वितरित करण्यात आले.