पालघर जिल्ह्यात ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबरला मतदार नोंदणीची विशेष मोहीम

Date: 2026-10-01
news-banner
नवयुग पालघर 
***पालघर जिल्ह्यात ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबरला मतदार नोंदणीची विशेष मोहीम***
**सर्व मतदान केंद्रांवर शिबिरे; पात्र नागरिकांनी मतदार यादीतील नाव तपासून नोंदणी व दुरुस्ती करून घ्यावी**
पालघर : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यात ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)-२०२६ अंतर्गत ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहून नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव किंवा इतर तपशिलांमध्ये दुरुस्ती करणे आणि निवडणुकीशी संबंधित विविध सेवांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
१८ वर्षे पूर्ण केलेले नवमतदार तसेच अद्याप मतदार यादीत नाव नोंदविलेले नसलेले पात्र नागरिक यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासंदर्भात नमुना ७ आणि नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांतील दुरुस्तीसाठी नमुना ८ बाबत शिबिरांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.

मतदारांना आवश्यक माहिती मिळावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
जिल्हा निवडणूक कार्यालय, पालघर 8767194013
१२८ डहाणू (अ.ज.) 9022704790
१२९ विक्रमगड (अ.ज.) 9325600479
१३० पालघर (अ.ज.) 8625099969
१३१ बोईसर (अ.ज.) 8669552696
१३२ नालासोपारा 9096392268
१३३ वसई 8830046860
याशिवाय नागरिकांना ईसीआयनेट मोबाईल ॲप आणि राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन मतदार सेवांचा लाभ घेता येणार आहे. मतदारांच्या मदतीसाठी १९५० हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीतील नाव तपासावे. नाव नोंदविलेले नसल्यास किंवा यादीतील तपशिलांमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. तसेच कुटुंबातील आणि परिसरातील पात्र नवमतदारांनाही नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
navyugpalghar.com
Follow us : Facebook | X | Instagram | YouTube
#मतदारनोंदणी #SIR2026 #पालघर #मतदारयादी #निवडणूक #नवमतदार #जिल्हाधिकारी #महाराष्ट्र #NavyugPalghar

Leave Your Comments