वाढवण बंदर प्रकल्पाचा केंद्रीय सचिवांकडून आढावा; बंदरविरोधी आंदोलन सुरू असतानाच, आंदोलकांना टाळून वरोर येथे भेट

Date: 2026-09-29
news-banner
नवयुग पालघर
***वाढवण बंदर प्रकल्पाचा केंद्रीय सचिवांकडून आढावा; बंदरविरोधी आंदोलन सुरू असतानाच, आंदोलकांना टाळून वरोर येथे भेट***

पालघर, २८ सप्टेंबर : वाढवण बंदर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आंदोलन वरोर परिसरात सलग ५८व्या दिवशी सुरू असताना भारत सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार, यांनी, सोमवारी वाढवण बंदर प्रकल्पाच्या वरोर येथील प्रकल्पस्थळाला भेट देऊन प्रकल्पाच्या प्रत्यक्ष प्रगतीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, प्रकल्पस्थळाच्या अगदी शेजारीच ग्रामस्थांचे बंदरविरोधी धरणे आंदोलन सुरू असताना,आंदोलकांना टाळून ही भेट झाली.

विजय कुमार यांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या विविध कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीश कुमार सिंह तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान किनाऱ्यालगतचा भराव, ब्रेकवॉटरचे बांधकाम, बाह्य संपर्क व्यवस्था, भूसंपादन आणि उपयोगिता पायाभूत सुविधांसह विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्याबरोबरीने आगामी टप्प्यांमध्ये हाती घेण्यात येणाऱ्या कामांची तसेच बांधकामाची गती वाढवण्यासाठी आवश्यक तयारीची माहितीही सचिवांना देण्यात आली असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकात सचिवांनी ‘हितधारकांशी संवाद साधला’ असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या भेटीबाबतची माहिती भेटीपूर्वी सार्वजनिक पातळीवर प्रकल्पधारकांना उपलब्ध झालेली नव्हती. त्यामुळे प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचे आंदोलन त्याच परिसरात सुरू असताना झालेल्या या भेटीच्या स्वरूपाबाबत स्थानिक पातळीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. किंबहुना संवाद साधल्याचा दावा केलेले हे हितधारक निवडक बंदर समर्थक असावे असा संघर्ष समितीचा आरोप आहे. दावा केलेल्या या संवाद साधलेल्या हितधारकांची नावे किंवा त्यांच्या प्रतिनिधित्वाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आलेले नसल्याने या आरोपाला पुष्टी मिळत आहे. हितधारकांशी संवाद साधावयाचा होता तर ग्रामस्थांना सूचना का दिली गेली नाही किंवा धरणेच्या ठिकाणी संवाद का साधला गेला नाही असा सवाल समितीने केला आहे.

या भेटीदरम्यान प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखण्याचे आणि विविध कामांना गती देण्याचे निर्देश सचिवांनी दिले. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सक्षम करणाऱ्या कामांसह इतर महत्त्वाच्या बाबी समांतरपणे पुढे जात असताना बांधकामाच्या कामांचा विस्तार करण्याच्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतल्याचे म्हटले आहे.

वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल यांनी सचिवांच्या भेटीमुळे विविध कामांच्या प्रगतीला गती देण्यासाठी मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले. प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजित आणि कालबद्ध पद्धतीने सुरू असून गुणवत्ता, शाश्वतता आणि कार्यान्वयन सज्जतेचे मानदंड कायम ठेवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे वरोर परिसरातील धरणे आंदोलन सलग ५८ दिवसांपासून सुरू आहे. बंदर प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमार, शेतकरी, जमीनधारक, पर्यावरण आणि पारंपरिक उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत आंदोलकांकडून आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे बंदराच्या प्रत्यक्ष प्रगतीचा केंद्रीय पातळीवरून आढावा घेतला जात असताना प्रकल्पस्थळालगत सुरू असलेल्या या आंदोलनाकडेही लक्ष वेधले जात आहे.

वाढवणबंदर #वरोर #पालघर #बंदरविरोधीआंदोलन #धरणेआंदोलन #ग्रामस्थ #मच्छीमार #भूसंपादन #पर्यावरण #वाढवण #NavYugPalghar

Leave Your Comments