नवयुग पालघर
***मनोर महसूल मंडळ पूर्वीप्रमाणे पालघर तहसीलशी जोडण्याची आमदार विलास तरे यांची मागणी***
पालघर : मनोर महसूल मंडळाचा बोईसर अपर तहसीलदार कार्यालयात करण्यात आलेला समावेश रद्द करून ते पूर्वीप्रमाणे पालघर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कायम ठेवावे, अशी आग्रही मागणी आमदार विलास तरे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी महसूलमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.
मनोर ते पालघर हे अंतर सुमारे १६ किलोमीटर असताना मनोर महसूल मंडळाला सुमारे ४८ किलोमीटर दूर असलेल्या बोईसर अपर तहसीलदार कार्यालयाशी जोडण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे आमदार तरे यांनी निवेदनात म्हटले आहे. महसुली कामांसाठी नागरिकांना दूरच्या कार्यालयात वारंवार जावे लागल्यास शेतकरी, कष्टकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर अतिरिक्त प्रवासखर्च व वेळेचा भार पडणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सातबारा, फेरफार, वारस नोंद, विविध दाखले तसेच जमीनविषयक कामांसाठी नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे महसूल प्रशासनाची पुनर्रचना करताना स्थानिक भौगोलिक परिस्थिती, नागरिकांची सोय आणि वाहतूक व्यवस्था यांचा विचार करणे आवश्यक असल्याची भूमिका तरे यांनी मांडली.
मनोर महसूल मंडळाच्या पुनर्रचनेबाबत झालेल्या सुनावणीत नागरिकांनी आपल्या अडचणी व हरकती मांडल्या होत्या. तसेच २५ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन या निर्णयामुळे होणाऱ्या गैरसोयीची माहिती देण्यात आली होती, असेही तरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
नागरिकांना महसुली सेवा सहज, जलद आणि जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हा महसूल प्रशासनाच्या पुनर्रचनेचा उद्देश आहे. त्यामुळे मनोरला दूरच्या बोईसर अपर तहसीलदार कार्यालयाशी जोडण्याचा निर्णय या उद्देशाशी विसंगत असल्याचे सांगत, मनोर महसूल मंडळ पूर्वीप्रमाणे पालघर तहसील कार्यालयाशी जोडण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी आमदार विलास तरे यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.
#मनोर #महसूलमंडळ #पालघर #बोईसर #विलासतरे #महसूलविभाग #महसूलप्रशासन #पालघरतालुका #शेतकरी #नागरिकांचीगैरसोय #महसूलमंत्री #चंद्रशेखरबावनकुळे
navyugpalghar.com
Facebook | X | Instagram | YouTube
Follow करा – नवयुग पालघर