***पालघरमध्ये १९ नोव्हेंबरपासून खासदार क्रीडा महोत्सवाचा जल्लोष; ३५ हजार खेळाडूंचा सहभाग!***
*प्रथमच दिव्यांग खेळाडूंनाही संधी; आठ तालुक्यांतील खेळाडूंचा सहभाग*
पालघर : पालघर जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार खेळाडूंच्या सहभागातून १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान खासदार क्रीडा महोत्सव २०२६ चा भव्य सोहळा रंगणार आहे. ग्रामीण, आदिवासी, शहरी तसेच दुर्गम डोंगरी भागातील खेळाडूंना आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर शहरातील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म. नी. दांडेकर हायस्कूलच्या क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या विष्णू रामा सवरा क्रीडा नगरीत विविध स्पर्धा पार पडणार आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच दिव्यांग खेळाडूंनाही या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी महोत्सवामागील भूमिका स्पष्ट करताना खेळाडूंना केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता त्यांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. खेळ हा केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरता मर्यादित नसून क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेच्या जोरावर खेळाडूंना शासकीय नोकरी आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. या महोत्सवातील काही गुणवंत खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना खेळासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमधील शाळांचे खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत. विशेषतः दुर्गम डोंगरी भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील मुले-मुली तसेच खुल्या गटात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या सांघिक खेळांसोबतच मैदानी स्पर्धा, लंगडी आणि रस्सीखेच यांसारख्या पारंपरिक खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या महोत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच दिव्यांग खेळाडूंना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळणार आहे.
ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडागुणांना वाव देऊन त्यांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार आहेत.
महोत्सवासाठी ५० फूट रुंद आणि ७० फूट लांबीचा मंडप उभारण्यात आला असून, प्रेक्षकांसाठी गॅलरी आणि बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी अल्पोपहार, भोजन तसेच आवश्यकतेनुसार निवास आणि परिवहनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडांगण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, महोत्सवाच्या आयोजनासाठी आवश्यक तयारी वेगाने सुरू आहे. या महोत्सवामुळे पालघर जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
महोत्सवाच्या नियोजनाचा आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी विष्णू रामा सवरा क्रीडा नगरी येथे विशेष सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, क्रीडा अधिकारी गिरीश इरनाक, आर्यन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य संतोष चुरी, पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मनोज ठाकूर, आशिष पाटील, पालघर केंद्रप्रमुख प्रकाश पळसुले, डहाणू केंद्रप्रमुख निलेश गायकवाड, डॉ. संपदा चौधरी यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
www.navyugpalghar.com
Follow : F । X । Insta । YT
#NavyugPalghar #Palghar #KhasdarKridaMahotsav #SportsFestival #PalgharNews #पालघर #क्रीडामहोत्सव