विशेष सखोल पुनरीक्षण -2026 साठी निवडणूक आयोगाची मुदतवाढ; अंतिम मतदार यादी आता २२ डिसेंबरला!

Date: 2026-11-18
news-banner
****विशेष सखोल पुनरीक्षण -2026 साठी निवडणूक आयोगाची मुदतवाढ; अंतिम मतदार यादी आता २२ डिसेंबरला!****
**ASDD मतदारांच्या गणना अर्जांचे वितरण व संकलन ३० नोव्हेंबरपर्यंत; दावे-हरकती निकाली काढण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत**

पालघर, दि. १८ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्रासह सात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमाला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे मतदार यादी पुनरीक्षणाच्या वेळापत्रकात बदल झाला असून, आता अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने १७ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार अर्थात ASDD (Absent, Shifted, Dead and Duplicate) मतदारांच्या गणना अर्जांचे वितरण आणि संकलन १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. या अर्जांवरील कार्यवाही १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील दावे व हरकती निकाली काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सुधारित वेळापत्रक महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, दिल्ली, नागालँड, तेलंगणा, हरियाणा आणि झारखंड या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना लागू राहणार आहे.

*मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांना सहकार्य करण्याचे आवाहन*
पालघर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सहभागी होऊन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विशेषतः ASDD वर्गवारीतील मतदारांनी मतदार नोंदणीसंदर्भातील आवश्यक माहिती व कागदपत्रे विहित मुदतीत सादर करावीत.

मतदार नोंदणी अधिकारी , सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनीही सुधारित वेळापत्रकानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामकाजास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
navyugpalghar.com
Follow : F/X/Insta/YT
#SIR2026 #मतदारयादी #ElectionCommission #Palghar #NavyugPalghar

Leave Your Comments