नवयुग पालघर
****कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्यांना मिळणार नवी दिशा; चार विद्यालयांना ‘डॉक्टर स्पीच’ सॉफ्टवेअर
पालघर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम; सुमारे ४०० विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ****
पालघर, दि. ३० ऑक्टोबर २०२६ : कर्णबधिर विद्यार्थ्यांना संवाद साधताना येणारे अडथळे दूर करून त्यांची भाषा, वाचा आणि संभाषण कौशल्ये विकसित करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील चार अनुदानित कर्णबधिर विद्यालयांना सुमारे २० लाख रुपये किमतीचे ‘डॉक्टर स्पीच’ हे विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले असून, या उपक्रमाचा लाभ सुमारे ४०० विद्यार्थ्यांना होणार आहे.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि समाजकल्याण अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी पालघर येथील कर्णबधिर विद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सॉफ्टवेअरच्या कार्यपद्धतीची पाहणी करून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सरावाची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांचे उच्चार सुधारणे, भाषा आत्मसात करण्याची क्षमता वाढविणे आणि बोलून संवाद साधण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना नियमित सरावाची संधी मिळणार असून, त्यांच्या संवाद कौशल्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
पालघर, डहाणू, जव्हार आणि विरार येथील अनुदानित कर्णबधिर विद्यालयांना हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासोबत संगणक, प्रिंटर, मायक्रोफोन आणि दोन स्पीकरही देण्यात आले आहेत. सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी संबंधित विद्यालयांतील विशेष शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे कर्णबधिर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि संवाद कौशल्य विकासाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आणि समाजकल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
#पालघर #जिल्हापरिषद #कर्णबधिरविद्यार्थी #दिव्यांगसक्षमीकरण #DoctorSpeech #शिक्षण #NavyugPalghar