दमण बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या पिकअपवर पालघर पोलिसांची कारवाई; ९.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Date: 2026-11-05
news-banner

नवयुग पालघर
****दमण बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या पिकअपवर पालघर पोलिसांची कारवाई; ९.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त
मनोर-जव्हार फाटा येथे नाकाबंदी; चालक मनोज त्रिपाठी याला अटक****

पालघर : दमण बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या पिकअप जीपवर पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत ९ लाख ८१ हजार ८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत वाहनचालक मनोज परमेश्वर त्रिपाठी (वय ४८) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना मनोर-विक्रमगड मार्गावरून पिकअप जीप (क्रमांक DD-01/AG/9308) मधून दमण बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मनोर-विक्रमगड मार्गावरील जव्हार फाटा येथे नाकाबंदी केली. यावेळी संशयित पिकअप जीप आढळून आल्यानंतर पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली.

वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव मनोज परमेश्वर त्रिपाठी, वय ४८ वर्षे, राहणार  सेलवासा असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारच्या दमण बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. या दारूची किंमत २ लाख ८१ हजार ८८ रुपये असून पिकअप वाहनासह एकूण ९ लाख ८१ हजार ८८ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंतदेसाई आणि त्यांच्या पथकाने केली.

navyugpalghar.com
#पालघर #मनोर #अवैधदारू #दमणदारू #पालघरपोलीस #गुन्हेअन्वेषण #NavyugPalghar

Leave Your Comments