नवयुग पालघर
****वाढवण बंदराच्या नावाखालील दलाली खपवून घेणार नाही; बंदर रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार – आमदार विनोद निकोले
डहाणू खाडीतील डंपर हटवण्याची मागणी; भाजपमुक्त पालघरचा निर्धार, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा****
पालघर : वाढवण बंदराच्या विरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनात सहभागी होऊन नंतर याच प्रकल्पाची कंत्राटे घेणाऱ्या दलालांना आमदार विनोद निकोले यांनी लक्ष्य केले. आंदोलनाशी गद्दारी करणाऱ्यांना प्रथम धडा शिकवण्याची गरज असून, डहाणू खाडीवर उभे केलेले डंपर तातडीने हटवावेत, अशी मागणी त्यांनी केली. वाढवण बंदर रद्द होईपर्यंत संघर्ष थांबणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला आगामी निवडणुकांत पालघर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा इशाराही दिला.
"वाढवण बंदर केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे सरकार सांगते; मात्र बंदर रद्द केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आमची नाळ या जमिनीशी जोडलेली आहे. जिल्हा वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत," असे निकोले यांनी स्पष्ट केले.
आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रकल्पाची कामे घेणाऱ्या लोकांवर टीका करताना त्यांनी अशा प्रवृत्तींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. डहाणू खाडीवर डंपर कोणी आणून उभे केले, असा सवाल करत संबंधित डंपर हटवण्याची मागणीही त्यांनी केली.
*भाजपमुक्त पालघरचा निर्धार*
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला देश स्वतःच्या मालकीचा असल्याची मग्रुरी निर्माण झाली आहे, अशी टीका निकोले यांनी केली. आगामी जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत पालघर जिल्हा भाजपमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दिल्लीतील युवकांच्या आंदोलनामुळे सरकारला झुकण्यास भाग पडल्याचा उल्लेख करत त्यांनी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचे आव्हानही दिले. "विधानसभा आणि लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, मग आम्ही आमची ताकद दाखवतो," असे ते म्हणाले.
*शेती आणि मच्छीमारीला प्राधान्य द्या*
विकासाच्या नावाखाली स्थानिकांची जमीन घेतली जात असून त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप निकोले यांनी केला. बुलेट ट्रेनसाठी जमीन घेतली, पण मोबदला दिला नाही, तसेच थर्मल पॉवर प्रकल्पात रोजगार दिल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचे ते म्हणाले.
"आमचा विकास करायचा असेल तर आमच्या शेतीला आणि मच्छीमारीला प्राधान्य द्या. खोटी आणि फसवी आश्वासने देऊ नका," अशी मागणी त्यांनी केली.
*महामार्ग आणि रेल्वे रोखण्याचा इशारा*
वाढवण बंदराच्या कामासाठी सुरू असलेली वाहतूक आणि कामे तातडीने बंद करण्याची मागणी करत निकोले यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. "उद्यापासून येथील काम बंद झाले पाहिजे. कोणत्याही ठेकेदाराचा डंपर या रस्त्याने दिसला तर तो सुटणार नाही. जबरदस्तीने काम सुरू केले तर महामार्ग आणि रेल्वे बंद करण्यात येईल," असे ते म्हणाले.
बंदर रद्द करण्यासाठी लाठीमार आणि गोळीबार सहन करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी संघर्ष समितीच्या पुढील आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
*५० जणांपासून २० हजारांपर्यंत आंदोलन*
वाढवण बंदरविरोधी आंदोलनाची सुरुवात ५० लोकांनी केली होती. आज हे आंदोलन २० हजार लोकांपर्यंत पोहोचले असून, पुढील आंदोलनाची हाक दिल्यास दोन ते तीन लाख लोक रस्त्यावर उतरतील, असा विश्वास आमदार निकोले यांनी व्यक्त केला.
"आज विरोध केला नाही, तर येणारी पिढी आपल्याला जाब विचारेल," असे सांगत त्यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
#VadhvanPort #वाढवणबंदर #वाढवणबंदरविरोधीआंदोलन #पालघर #डहाणू #विनोदनिकोले #भाजपमुक्तपालघर #NavyugPalghar
Follow: F | X | Instagram | YouTube