नवयुग पालघर
****दापचरी येथे १५.२५ लाखांचा मद्यसाठा जप्त; एकाला अटक
महेंद्रा पिकअपमधून प्रतिबंधित विदेशी मद्याची वाहतूक; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई****
पालघर, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ : तलासरी तालुक्यातील उधवा-खानवेल रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दापचरी सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने कारवाई करत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे ४४ बॉक्स जप्त केले. या कारवाईत मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महेंद्रा पिकअप टेम्पो असे एकूण १५ लाख २५ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला ३१ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार उधवा-खानवेल रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी उधवा दिशेने जाणाऱ्या महेंद्रा पिकअप टेम्पो (क्रमांक MH 05 GA 5370) चा संशय आल्याने पथकाने त्याचा पाठलाग केला. वाहनचालकाने उधवा येथे रस्त्याच्या कडेला वाहन थांबविल्यानंतर तपासणी करण्यात आली.
वाहनाच्या मागील बाजूस रिकामे प्लास्टिकचे क्रेट ठेवण्यात आले होते. या क्रेटच्या मागे आणि वाहनाच्या केबिनलगत तयार केलेल्या चोरकप्प्यात व्हिस्की व बिअरच्या सीलबंद बाटल्यांचे बॉक्स लपविल्याचे आढळले. तपासणीदरम्यान महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित आणि दादरा-नगर हवेली येथे विक्रीस असलेले परराज्यातील विदेशी मद्याचे एकूण ४४ बॉक्स जप्त करण्यात आले.
जप्त मद्यसाठ्यात ३७८ बल्क लिटर विदेशी मद्य आणि २४ बल्क लिटर बिअरचा समावेश असून, त्याची अंदाजे किंमत ६ लाख ७ हजार ६८० रुपये आहे. मद्य वाहतुकीसाठी वापरलेले पांढऱ्या रंगाचे महेंद्रा पिकअप टेम्पोही जप्त करण्यात आले. वाहनाची किंमत आणि मद्यसाठा मिळून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १५ लाख २५ हजार ६८० रुपये आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. जी. सूर्यवंशी करीत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पालघर अधीक्षक गणेश बारगजे आणि उपअधीक्षक अविनाश रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत निरीक्षक एस. एस. फडतरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. सूर्यवंशी, मोहन पवार, पी. सी. पाटील तसेच जवान व वाहनचालक महेंद्र पाडवी, विठ्ठल शिंदे, योगेश अंभोरे, करण दडस आणि गणेश शितोळे सहभागी होते.
#पालघर #तलासरी #दापचरी #राज्यउत्पादनशुल्क #मद्यसाठा #गुन्हे #NavyugPalghar