वाढवण बंदरविरोधी आंदोलनात फूट पाडणाऱ्या दलालांचा बंदोबस्त करा; अंबादास दानवेंचे आक्रमक आवाहन

Date: 2026-11-05
news-banner

नवयुग पालघर
****वाढवण बंदरविरोधी आंदोलनात फूट पाडणाऱ्या दलालांचा बंदोबस्त करा; अंबादास दानवेंचे आक्रमक आवाहन****

“स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय अदानी-अंबानींना प्रकल्प राबविणे शक्य नाही; आंदोलनात सहभागी होऊन नंतर प्रकल्पांची कंत्राटे घेणाऱ्यांवर लक्ष ठेवा”
वाढवण बंदरविरोधी आंदोलनात सहभागी होऊन नंतर प्रकल्पाची कामे घेणाऱ्या व्यक्तींवर तीव्र टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलनात फूट पाडणाऱ्या मध्यस्थांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन केले. “आंदोलनात सहभागी होऊन नंतर प्रकल्पांची कंत्राटे घेणाऱ्यांना सर्वप्रथम जोडे मारायला हवेत. आपल्यातील कोण प्रकल्पांची कामे घेत आहे, यावर लक्ष ठेवा,” असे आक्रमक वक्तव्य त्यांनी केले.पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीतर्फे आयोजित जन आक्रोश सभेत ते बोलत होते. राजकीय पक्ष तसेच विविध संघटनाचा सहभाग असलेल्या या सभेस हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता.

*स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय प्रकल्प शक्य नाहीत*
अंबानी, अदानी किंवा जिंदाल यांसारख्या उद्योगसमूहांना स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय येथे काम करणे शक्य नाही. त्यामुळे प्रकल्पविरोधी आंदोलनात सहभागी असल्याचे दाखवून नंतर कंत्राटे घेणाऱ्या स्थानिकांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे दानवे म्हणाले. आंदोलनातील अशा व्यक्तींमुळे संघर्ष कमकुवत होत असून, त्यांना वेळीच रोखले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

*मध्यस्थांवर टीका; आंदोलनात फूट पाडणाऱ्यांना लक्ष्य*
अमित चुरी यांचा उल्लेख करत दानवे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. आंदोलन कमकुवत करणाऱ्या मध्यस्थांचा बंदोबस्त केल्यानंतरच सरकारकडे जावे, असे ते म्हणाले. आंदोलनातील एकजूट टिकविण्यासाठी प्रकल्पसमर्थक भूमिका घेणाऱ्या आणि कंत्राटांच्या माध्यमातून आंदोलनाला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

*प्रकल्पांमधील रोजगाराचे आश्वासन फसवे*
गेल्या ३० वर्षांपासून हा संघर्ष सुरू असल्याचे सांगत दानवे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे उदाहरण दिले. तेथे पाच हजार नोकऱ्या निर्माण झाल्याचे सांगितले जात असले, तरी आदिवासी बांधवांना रस्ते झाडणे, वॉचमन आणि सफाईसारखी कामेच मिळतात. कारकूनासारखी साधी नोकरीही स्थानिकांना मिळत नाही, तर चांगल्या नोकऱ्या बाहेरच्या लोकांना दिल्या जातात, असा आरोप त्यांनी केला.
मोठे प्रकल्प स्थानिकांच्या विकासासाठी नव्हे, तर उद्योगसमूहांचे व्यवसाय वाढविण्यासाठी आणले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

*७६ हजार कोटींचा प्रकल्प; शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपये*
वाढवण बंदरासाठी ७६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जात असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली जाते. त्यातही ३० टक्के नुकसान झालेल्यांनाच मदत मिळणार असल्याचे दानवे यांनी निदर्शनास आणले. दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी ८५ हजार कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
मतदान करताना या बाबींचा विचार करण्याचे आवाहन करत, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असते तर वाढवण बंदरासह सर्व कथित विनाशकारी प्रकल्प बंद झाले असते, असा दावा त्यांनी केला.

*समुद्र, शेतजमीन आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी लढा*
“हा समुद्र, ही शेतजमीन आणि मच्छीमारांचे जाळे आपले आहे. त्यांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवावी लागेल,” असे आक्रमक आवाहन दानवे यांनी केले.
पोलिसांना घाबरण्याची गरज नसल्याचे सांगत, पोलिसांनी सरकारची दलाली न करता जनतेची सेवा करावी, असे ते म्हणाले. पोलिसांना जनतेच्या पैशातून पगार मिळतो, याची जाणीव त्यांनी ठेवावी, अशी टीकाही त्यांनी केली.

*५६ संघटनांचा सहभाग; मुख्यालयाला घेराव घालण्याचे आवाहन*
वाढवण बंदरविरोधी आंदोलनात ५६ संघटना सहभागी असल्याचे सांगत दानवे यांनी आता रोज निवेदने देण्यापेक्षा मुख्यालयाला घेराव घालून आंदोलन अधिक आक्रमक करण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले.

वाढवण बंदर आणि विमानतळ अदानी समूहाच्या घशात घातल्याचा आरोप करत त्यांनी या ठिकाणांचा वापर तस्करीसाठी होत असल्याचा दावा केला. सोने तस्करी प्रकरणात भाजप कार्यकर्ते सापडल्याचा आरोपही त्यांनी केला.
“या संघर्षात आम्ही खांद्याला खांदा लावून नव्हे, तर एक पाऊल पुढे राहून लढण्यास तयार आहोत,” असे सांगत दानवे यांनी आंदोलन अधिक आक्रमकपणे पुढे नेण्याचे आवाहन केले.

नवयुग पालघर | navyugpalghar.com
#वाढवणबंदर #वाढवणबंदरविरोधीआंदोलन #अंबादासदानवे #पालघर #मच्छीमार #आदिवासी #स्थानिकहक्क #NavyugPalghar

Leave Your Comments