नवयुग पालघर
**डोल्हारी बुद्रुक येथे मनरेगा अंतर्गत विकासकामांचा आरंभ**
विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक (खोमारपाडा) येथे ‘विकसित भारत-रोजगार आणि आजीविका हमी अभियान’ अंतर्गत विविध विकासकामांचा गुरुवारी आरंभ करण्यात आला. जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते या कामांची सुरुवात झाली.
यामध्ये जिवब लक्ष्मण टोकरे यांच्या कुक्कुटपालन शेड, सुनील कान्हा टोकरे आणि अजय अर्जुन टोकरे यांच्या गोठ्यांच्या कामांसह विखुरलेल्या स्वरूपातील वृक्षलागवड कामांचा समावेश आहे.
यावेळी उपजिल्हा कार्यक्रम समन्वय अधिकारी (मनरेगा) अतुल पारसकर, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, शाश्वत उपजीविका, जलसंधारण, वृक्षलागवड आणि शेततळी यांसारख्या विकासकामांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.