नवयुग पालघर
https://youtube.com/shorts/iVPcoy_WxHQ?si=ke8JbFUdX8HjOVpC
****पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; प्रशासन सतर्क; काही मार्ग वाहतुकीसाठी बंद, धरणांवर बारकाईने लक्ष****
पालघर, दि. २३ जुलै : पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून, ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने, रस्त्यांवर पाणी साचल्याने तसेच दरड कोसळल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क असून, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून परिस्थितीवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, अग्निशमन दल व संबंधित यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख धरणे, नद्या, पूरप्रवण क्षेत्रे तसेच लघुपाटबंधारे प्रकल्पांवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंतच्या प्रकल्पीय पाणीसाठा अहवालानुसार धामणी धरणात ९३.३९ टक्के, कवडास धरणात ४४.७८ टक्के आणि मध्य वैतरणा धरणात ६२.२१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तानसा धरण, वांद्री मध्यम प्रकल्प आणि मोडक सागर धरण हे १०० टक्के भरलेले आहेत. संबंधित धरणांमधील पाण्याची आवक, पाणीपातळी व आवश्यकतेनुसार नियंत्रित विसर्गावर संबंधित पाटबंधारे विभागाकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. सध्या कोणतीही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली नसली तरी संभाव्य परिस्थितीचा विचार करून सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून प्रत्येक घडामोडीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
लघुपाटबंधारे योजनांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मनोर, देवखोप, खांड, मोहखुर्द, वाघ आणि डोमीहिरा हे लघुपाटबंधारे १०० टक्के भरले असून माहिम-केळवा (९८.१२ टक्के), रायतळे (९६.११ टक्के) आणि तुळयाचापाडा (५४.५६ टक्के) या प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. या सर्व प्रकल्पांवर संबंधित विभागामार्फत नियमित देखरेख ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार तात्काळ बचाव व मदतकार्य हाती घेण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
वाहतुकीवर परिणाम झालेली ठिकाणे :
• पालघर : मासवण येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद.
• मनोर : मासवण पुलाजवळ पालघरकडे जाणारा रस्ता तसेच भोपोली येथील रस्ता बंद.
• बोईसर : बोईसर–सरावली रस्ता बंद.
• वाणगाव : वाणगाव–चिंचणी मार्गावरील वाहतूक बंद.
• तारापूर : तारापूर बायपास येथे पाणी साचल्यामुळे रस्ता बंद.
• डहाणू : आशागड, चरी गंगाज, सरावली बस डेपो, इराणी रोड, सागर नाका, कक्राडी ब्रिज तसेच डहाणू–कोसबाड मार्गावर पाणी भरल्याने वाहतूक बंद.
• घोलवड : झाई–बोर्डी–चिखली–घोलवड मार्ग बंद.
• तलासरी : सूत्रकार–कुर्झे, तलासरी–संजान, बोरसपाड–नारायण ठाणे तसेच धुंधलवाडी–आंबेसरी मार्गावरील वाहतूक बंद.
• कासा : कासा–चारोटी मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. सायवन–वाघाडी रस्ता बंद.
• विक्रमगड : शिल–देहेर्जे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद.
• जव्हार : जव्हार–झाप मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद.
• मोखाडा : धामोडी येथे दरड कोसळल्याने रस्ता बंद.
• वाडा : ब्राह्मणगाव–कुर्झे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद.
इतर भागातील परिस्थिती
सफाळे, केळवा आणि सातपाटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाऊस सुरू असला तरी पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे किंवा कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे शांततापूर्ण आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ जिल्हा प्रशासन व संबंधित शासकीय यंत्रणांकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदी, नाले, धरणांच्या विसर्ग क्षेत्रात अथवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, अतिवृष्टीदरम्यान अनावश्यक प्रवास करू नये, स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे, बंद करण्यात आलेल्या रस्त्यांवरून किंवा पाण्याखालून जाण्याचा प्रयत्न न करण्याचे तसेच प्रशासन व पोलीस विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत पूर परिस्थितीबाबत वेळोवेळी माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा अथवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवून प्रशासन व पोलीस विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.