डहाणूतील पुराने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले; १०० ते २०० दुकाने बाधित, नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेजची आग्रही मागणी

Date: 2026-07-30
news-banner
नवयुग पालघर
https://youtube.com/shorts/SqgdWnt5vXA?si=wqcbk8loMWlLUz-P

****डहाणूतील पुराने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले; १०० ते २०० दुकाने बाधित, नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेजची आग्रही मागणी***
जुलैअखेरीस झालेल्या विक्रमी पावसाने डहाणू शहरातील व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. इराणी रोड, रेल्वे स्टेशन रोड, सागर नाका, के. टी. नगर, वडकून परिसर, जलाराम मंदिर, चंद्रिका हॉटेल परिसरासह अनेक भागांतील सुमारे १०० ते २०० दुकाने व व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाच ते दहा फूट पाणी शिरले. दुकानांतील स्टेशनरी, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, फर्निचर, कागदपत्रे आणि इतर माल चिखलात गाडला गेला असून प्राथमिक अंदाजानुसार व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

२२ आणि २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तासांतच शहरातील अनेक भाग जलमय झाले. अनेकांना दुकानातील माल बाहेर काढण्याची किंवा सुरक्षित ठिकाणी हलविण्याची संधीही मिळाली नाही. काही व्यापाऱ्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुकान सोडून वरच्या मजल्यावर किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. पूर ओसरल्यानंतर दुकानांमध्ये चिखल, दुर्गंधी आणि खराब झालेल्या मालाचे ढीग दिसून येत असून व्यापारी अजूनही साफसफाई आणि नुकसानाचा आढावा घेण्यात व्यस्त आहेत.

व्यापारी विजय सोनी यांनी सांगितले की, त्यांच्या स्टेशनरी दुकानातील सुमारे ₹८ लाखांचा माल पाण्यात खराब झाला. दुकान पूर्ववत सुरू करण्यासाठी अजून अनेक दिवस लागतील. तर व्यापारी दीपेश बोथरा यांनी सांगितले की, "२५ वर्षांनंतर डहाणूत इतका भीषण पूर पाहायला मिळाला. ड्रेनेज व्यवस्था कमकुवत असणे, वाढते अतिक्रमण आणि अनियोजित बांधकामांमुळे पाण्याचा निचरा न झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली."
पूरानंतर व्यापाऱ्यांना आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. खराब झालेला माल फेकून देणे, दुकानातील चिखल काढणे, दुरुस्ती करणे आणि पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. अनेक व्यापाऱ्यांना मोठ्या सवलतीत उरलेला माल विकण्याची वेळ आली असून, काहींनी तर हजारो रुपयांचा माल अक्षरशः टाकून दिला आहे.

डहाणू जैन सोशल ग्रुपचे रीजनल झोन जॉइंट सेक्रेटरी जैन मोदी यांनी सांगितले की, डहाणूतील व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने तातडीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी. केवळ प्रतीकात्मक मदत न देता व्यापाऱ्यांना व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याबरोबरच अवैध बांधकामांवरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते.

दरम्यान, डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांनी पूरग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली. घरांच्या नुकसानीसाठी शासनाच्या नियमांनुसार आर्थिक मदत दिली जाते. मात्र, दुकानांमधील व्यावसायिक नुकसानीसाठी स्वतंत्र नुकसानभरपाईची तरतूद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर, अतिवृष्टीनंतर पालघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यापारी वर्गालाही मोठा फटका बसल्याचे मान्य करत, भविष्यात व्यापाऱ्यांनी व्यवसाय व मालमत्तेचा विमा काढणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले होते. हवामान बदलामुळे अशा नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढत असून व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मिळून विमा संरक्षणाबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी नमूद केले. अतिवृष्टीमुळे एका वस्त्रव्यवसायिकाचे ₹४० ते ₹५० लाखांचे नुकसान झाल्याचे उदाहरणही त्यांनी दिले होते.

मात्र, डहाणूतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, विमा हा भविष्यासाठी महत्त्वाचा उपाय असला तरी सध्याच्या संकटात सर्वस्व गमावलेल्या व्यापाऱ्यांना तातडीच्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी सफाळे येथील अनेक दुकानदारांनाही अशाच प्रकारच्या भीषण नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करून व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

Leave Your Comments