नवयुग पालघर
****कर्म, ज्ञान आणि भक्तीचा संगम म्हणजेच सोनोपंत दांडेकर; ऋग्वेदातील तत्त्वज्ञान समजून घेण्याचे आवाहन****
पालघर, दि. २८ : वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू आणि महाराष्ट्राचे आधुनिक संत वै. सोनोपंत (सोनूमामा) दांडेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित व्याख्यानात ऋग्वेदातील तत्त्वज्ञान आणि भक्तीचा विचार उलगडताना कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच वै. सोनोपंत दांडेकर होते, असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या डॉ. सुचेता परांजपे यांनी केले. ऋग्वेद म्हणजे ज्ञानाचा अखंड स्रोत असून त्यातील विचार समजून घेण्यासाठी प्रत्येकाने प्राचीन वेदांचे वाचन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात तत्त्वज्ञान विभागातर्फे वै. सोनोपंत दांडेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 'ऋग्वेदातील तत्त्वज्ञान व भक्ती' या विषयावर डॉ. सुचेता परांजपे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ. परांजपे यांनी ऋग्वेद संहितेच्या प्राचीनतेचा आढावा घेत विविध सूक्ते, सौंदर्यशास्त्र, सत्ताशास्त्र आणि ज्ञानमीमांसा यांच्या आधारे ऋग्वेदातील तत्त्वज्ञान व विज्ञानातील परस्परावलंबित्व स्पष्ट केले. भक्ती म्हणजे ईश्वराविषयी आणि आराध्यदैवताविषयी सर्वोच्च प्रेम व आदर असल्याचे सांगत त्यांनी वसिष्ठ-वरुण संवादाचा दाखला दिला. ऋग्वेद म्हणजे ज्ञान असून ते सर्वांनी आत्मसात करावे, यासाठी प्राचीन वेदांचे वाचन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत वै. सोनोपंत दांडेकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, ज्ञानोपासक जीवन, समाजप्रबोधनाचे कार्य आणि मूल्यनिष्ठ विचारांचा समृद्ध वारसा संस्था व महाविद्यालय जपत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर दांडेकर होते. त्यांनी वेद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी तसेच वैदिक तत्त्वज्ञान आणि भक्ती यांतील सहसंबंध स्पष्ट केला. संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचा आणि महाविद्यालयाचा विकास साधावा, असे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रा. अशोक ठाकूर, उपाध्यक्ष धनेश वर्तक, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी व अनिल पाटील, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा, संस्थेचे सदस्य, दांडेकर कुटुंबीय तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. सूत्रसंचालन प्रा. अनघा पाध्ये-देशमुख यांनी केले, तर आभार डॉ. रोहित गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख, प्रा. डॉ. तानाजी पोळ आणि प्रा. विवेक कुडू यांनी परिश्रम घेतले.