नवयुग पालघर
****अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत, नुकसानग्रस्त रस्ते व वीजपुरवठा पूर्ववत करण्याची माजी आमदार राजेश पाटील यांची मागणी****
पालघर, दि. २८ जुलै : पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी, पूरग्रस्त नागरिक आणि व्यावसायिकांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, नुकसानग्रस्तांचे त्वरित पंचनामे करावेत तसेच खराब झालेले रस्ते आणि विस्कळीत वीजपुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत करावा, अशी मागणी माजी आमदार राजेश रघुनाथ पाटील यांनी जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेती, घरे, व्यावसायिक आस्थापना आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करून कोणताही भेदभाव न करता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पूरस्थितीमुळे अनेक गावांमध्ये व पाड्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य, कपडे, फर्निचर, घरगुती उपकरणे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त कुटुंबांचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्याबरोबरच आवश्यक जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय, लघुउद्योग, दुकानदार तसेच इतर व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आपत्ती निवारण योजनेंतर्गत मदत देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अनेक ग्रामीण रस्ते वाहून गेले असून अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गावागावांतील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागांना तातडीने निर्देश देऊन हे रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करून वाहतुकीसाठी पूर्ववत करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब कोसळून विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाल्याने काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. नुकसानग्रस्त विद्युत यंत्रणा तातडीने दुरुस्त करून सुरक्षित व सुरळीत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, पूरग्रस्त नागरिक आणि नुकसानग्रस्त व्यावसायिकांना तातडीने दिलासा मिळावा तसेच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त रस्ते व वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती माजी आमदार राजेश रघुनाथ पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.