नवयुग पालघर
****वाढवण परिसरात मनाई आदेश लागू; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय****
डहाणू, दि. २९ : वाढवण बंदर प्रकल्पाच्या कामाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डहाणू विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक जिल्हादंडाधिकारी यांनी संबंधित परिसरात मनाई आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
वाढवण बंदरासाठी नियोजित निअरशोर रिक्लेमेशन (Nearshore Reclamation) काम सुरू करण्यात आले असून, या कामासाठी कोळवली, वाणगाव, बावडा, ताणशी, चिंचणी, वरोर ते किनारपट्टीदरम्यान प्रवेश रस्ता तयार करण्यात येत आहे. या कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरातील ग्रामस्थ वृक्षतोड, खारफुटीच्या नाशाचा आरोप तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता पोलीस बंदोबस्तात काम सुरू असल्याचा दावा करत सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात असून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या कायदेशीर हक्कावर ही गदा असल्याची आंदोलन कर्त्यांची भावना आहे.
आदेशानुसार, संबंधित कामाच्या ठिकाणापासून सुमारे ५०० मीटर परिसरात काम करणारे अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्याशिवाय इतर व्यक्तींना जमाव करण्यास किंवा विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल किंवा कामात अडथळा निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.