***कृषी दिनानिमित्त प्रगत शेतकऱ्यांचा गौरव शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी सक्षमीकरणावर भर***

Date: 2026-07-07
news-banner

नवयुग पालघर

https://youtu.be/LphYMLxdbbs?si=Q7FDfzhgjUQ5WWu0

***कृषी दिनानिमित्त प्रगत शेतकऱ्यांचा गौरव

शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी सक्षमीकरणावर भर***

          जिल्हा परिषद पालघर येथे कृषी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रगत शेतकरी, महिला बचत गट आणि विविध कृषी योजनांच्या लाभार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमातून शाश्वत शेतीचा संकल्प व्यक्त करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

           कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, प्रकाश हसनाळकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) व्यंकटराव हुंडेकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ 
डॉ. अंकुश धाने, तालुका कृषी अधिकारी स्मिता पाटील, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

*प्रगत शेतीकडे वाटचाल*
             प्रास्ताविकात कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी खरीप हंगामासाठी खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. तसेच मोगरा, सोनचाफा यांसारख्या फुलपिकांसह दालचिनी आणि काळीमिरी यांसारख्या मसाला पिकांमुळे उत्पन्नवाढीच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.

*सन्मान सोहळा ठरला आकर्षण*
            कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रगत शेतकरी, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे लाभार्थी, जिल्हा परिषद सेस फंडातील विविध योजनांचा लाभ घेतलेले शेतकरी तसेच मशरूम लागवडीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. सन्मानित शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडत आधुनिक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले.

━━━━━━━━━━━━━━━━━━

• खरीप हंगामासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा साठा

• फुलपिके आणि मसाला पिकांना प्रोत्साहन

• प्रगत शेतकरी व महिला बचत गटांचा गौरव

• शेतकरी विमा आणि योग्य बाजारभावावर भर

• आधुनिक आणि शाश्वत शेतीचा संदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━

"शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि शासन योजनांचा प्रभावी लाभ घेतल्यास शेती अधिक समृद्ध आणि शाश्वत होईल."

— मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी

"शाश्वत विकासासाठी शाश्वत शेती हीच काळाची गरज आहे. नैसर्गिक संसाधनांचे जतन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक आहे."

— अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

━━━━━━━━━━━━━━━━━━
           कार्यक्रमात विविध कृषी योजनांची माहिती देण्यात आली तसेच शेतकरी, अधिकारी आणि कृषी तज्ज्ञ यांच्यात कृषी विकासाच्या विविध विषयांवर चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश साबळे यांनी केले.

Leave Your Comments