नवयुग पालघर
**आगरी बोलीभाषा रुजविण्यासाठी मायखोपच्या शाळेत
अनोखी भाषांतर स्पर्धा**
मायखोप, दि. १५ : आगरी बोलीभाषेचा विद्यार्थ्यांमध्ये परिचय वाढावा, आपल्या बोलीविषयी प्रेम निर्माण व्हावे आणि आगरी भाषा बोलता-लिहिता यावी, या उद्देशाने आगरी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने मायखोप येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त आगरी बोलीभाषा भाषांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
आगरी साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, साहित्यिक व लेखक संजय पाटील मायखोपकर यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना एक परिच्छेद देऊन त्याचे आपल्या आगरी बोलीभाषेत भाषांतर करण्यास सांगण्यात आले. शाळेतील १९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत आगरी भाषेत लेखन केले.
स्पर्धेत इयत्ता पाचवीतील देवांश घरत याने प्रथम क्रमांक, तर कश्यप किणी याने द्वितीय क्रमांक मिळविला. इयत्ता चौथीतील धैय पाटील हिने प्रथम, तर आर्वी भोईर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच नक्ष भोईर आणि परी पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रत्येक इयत्तेतील प्रथम, द्वितीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना पुस्तके व पेन देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणप्रेमी संतोष प्रमोद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी आवश्यक पुस्तके दत्तात्रेय भोईर, विनोद भोईर, राकेश रमेश भोईर, महेंद्र रामचंद्र पाटील आणि सरपंच महेंद्र किणी यांनी उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाला उपस्थित पालकांना शाळेच्या माजी विद्यार्थी समूहात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षिका सुजाता राऊत यांनी केले. शाळेच्या अडचणी व समस्या मांडाव्यात आणि माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी एकत्रितपणे त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास राजेश इनामदार परिवार, उपसरपंच स्वप्निल भोईर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोईर, ग्रामविकास अधिकारी संतोष पाटील आणि अंकल रोठेकर उपस्थित होते. दरम्यान, शाळेच्या कंपाउंडसाठी इनामदार परिवाराने भरघोस आर्थिक मदत दिली.