ठाणे–पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या कामांना गती ; ७ पैकी ३ बोगद्यांचे आरपार खोदकाम पूर्ण होऊन आरपार जोडले गेले आहेत... वैतरणा नदीवरील २.३२ किमी पुलासह १३५.४५ किमी मार्ग व बोईसर स्थानकाचे कामही प्रगतीपथावर****

Date: 2026-09-01
news-banner
.=
नवयुग पालघर
****ठाणे–पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या कामांना गती ; ७ पैकी ३ बोगद्यांचे आरपार खोदकाम पूर्ण होऊन आरपार जोडले गेले आहेत...
वैतरणा नदीवरील २.३२ किमी पुलासह १३५.४५ किमी मार्ग व बोईसर स्थानकाचे कामही प्रगतीपथावर****

पालघर : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील कामांनी गती पकडली असून, ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा ते महाराष्ट्र–गुजरात सीमेवरील जरोली गावापर्यंतच्या १३५.४५ किमी लांबीच्या एलिव्हेटेड (उन्नत) मार्गावर विविध टप्प्यांतील बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे  केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मार्गावरील सुरू असलेल्या बांधकामाची झलक प्रसिद्ध करत म्हटले आहे. असे असले तरी संपूर्ण प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले जात आहे.
 या मार्गाचा मोठा भाग ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून जात असल्याने पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेनच्या पायाभूत सुविधांच्या कामांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. 

या १३५.४५ किमी मार्गामध्ये तब्बल १२४.०२७ किमी लांबीचे व्हायाडक्ट (उन्नत मार्ग) आणि पूल समाविष्ट आहेत. या सेक्शनमध्ये १०० किमीपेक्षा अधिक लांबीच्या भागात पिअरचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी सुमारे ७४ किमी लांबीचे पिअर व्हायाडक्ट गर्डर बसविण्यासाठी तयार आहेत. बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी महाराष्ट्रात ९ कास्टिंग यार्ड, ७ फुल-स्पॅन लॉन्चिंग गॅन्ट्री आणि ८ एसबीएस लॉन्चिंग गॅन्ट्री कार्यरत असल्याचे यात म्हटले आहे.

*७ बोगद्यांपैकी ३ बोगद्यांचे खोदकाम पूर्ण*
ठाणे–पालघर मार्गातील डोंगराळ भूप्रदेशातून जाणाऱ्या भागात एकूण ७ पर्वतीय बोगदे प्रस्तावित आहेत. यापैकी ३ बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून हे बोगदे आरपार जोडले गेले आहेत . पुढील टप्प्यात बोगद्यांमध्ये ड्रेनेज, वॉटरप्रूफिंग आणि टनेल लाइनिंगची कामे सुरू आहेत.

*वैतरणेवरील २.३२ किमीचा पूल ठरणार महत्त्वाचा*
या मार्गावरील प्रमुख अभियांत्रिकी कामांमध्ये वैतरणा नदीवरील तब्बल २.३२ किमी लांबीचा पूल महत्त्वाचा आहे. याशिवाय उल्हास नदीवर ४६० मीटर आणि जगनी नदीवर ५१० मीटर लांबीच्या पुलांचे बांधकाम सुरू आहे.
प्रकल्पाच्या या सेक्शनमध्ये प्रमुख रेल्वेमार्ग, नद्या, मुंबई–नाशिक महामार्ग आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवरील पुलांसह एकूण ३६ पूल व क्रॉसिंग आहेत. यामध्ये १२ स्टील ब्रिजचाही समावेश आहे.

*महाराष्ट्रात तीन स्थानके*
महाराष्ट्रातील या मार्गावर ठाणे, विरार आणि बोईसर अशी तीन एलिव्हेटेड बुलेट ट्रेन स्थानके उभारली जात आहेत. ठाणे परिसरातील कांदळवनांचे संरक्षण लक्षात घेऊन ठाणे स्थानकाची रचना करण्यात आली असून, त्याचा कॉन्कोर्स स्तर नैसर्गिक जमिनीपासून सुमारे १२ मीटर उंच ठेवण्यात येणार आहे.
बुलेट ट्रेनचा हा उन्नत मार्ग, नदीवरील पूल, पर्वतीय बोगदे आणि स्थानकांची कामे एकाच वेळी पुढे सरकत असल्याने मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाने महाराष्ट्रातील बांधकामाच्या टप्प्यात लक्षणीय गती घेतली असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.

*▣ बुलेट ट्रेनचा खर्च दुपटीच्या जवळ; १.१० लाख कोटींवरून २.१० लाख कोटी**
अहमदाबाद–मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या एकूण खर्चात मोठी वाढ झाली असून सुरुवातीला सुमारे १.१० लाख कोटी रुपये असलेला प्रकल्पाचा खर्च आता जवळपास २.१० लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील जमीन संपादनासाठी लागलेला अधिक वेळ तसेच जपानकडून ट्रेनसेट मिळण्यास झालेला विलंब ही खर्चवाढीमागील प्रमुख कारणे आहेत.
दरम्यान, बुलेट ट्रेनची सेवा येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी संपूर्ण प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य असल्याचे समजते...****



Leave Your Comments