१६ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांपर्यंत झेप; ‘निपुण पालघर २.०’चा शुभारंभ**** **उर्वरित विद्यार्थ्यांनाही निपुण स्तरावर नेण्याचे लक्ष्य; पायाभूत कौशल्यांसह स्पर्धा परीक्षांच्या तयारीवरही भर

Date: 2026-09-01
news-banner

नवयुग पालघर

****१६ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांपर्यंत झेप; ‘निपुण पालघर २.०’चा शुभारंभ****

**उर्वरित विद्यार्थ्यांनाही निपुण स्तरावर नेण्याचे लक्ष्य; पायाभूत कौशल्यांसह स्पर्धा परीक्षांच्या तयारीवरही भर**


पालघर, दि. १ सप्टेंबर २०२६ :  १६ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांपर्यंत झालेली निपुण विद्यार्थ्यांची वाढ उल्लेखनीय असल्याचे सांगत, उर्वरित विद्यार्थ्यांनाही निपुण स्तरापर्यंत नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी  केले. कृती पुस्तिकांचा प्रभावी वापर आणि निपुण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यावर विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अध्ययन गुणवत्तेत मागील वर्षी झालेली लक्षणीय वाढ पुढे नेत आता उर्वरित विद्यार्थ्यांनाही निपुण स्तरावर पोहोचविण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन ‘निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान २.०’ सुरू करण्यात आले असून, १ सप्टेंबर २०२६ ते ३० मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद पीएम श्री शाळा वेवूर, (केंद्र नवली, ता. पालघर) येथे  रानडे यांच्या हस्ते अभियानाचा आरंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर "यावेळी  उपस्थित होत्या.


मागील शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या ‘निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियाना’तून विद्यार्थ्यांच्या अध्ययन गुणवत्तेत मोठी सुधारणा झाल्याचे दिसून आल्याचे सांगतानाच प्रारंभिक स्तर पडताळणीत केवळ १६ टक्के विद्यार्थी निपुण स्तरावर, तर ५० टक्के विद्यार्थी L1 स्तरावर होते मात्र सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रयत्नांनंतर चाचणी क्रमांक १ मध्ये निपुण विद्यार्थ्यांचे प्रमाण ३६ टक्के, तर चाचणी क्रमांक २ मध्ये ५७ टक्क्यांवर पोहोचले. त्याचवेळी L1 स्तरावरील विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांवरून केवळ १ टक्क्यावर आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


विषयनिहाय चाचणी क्रमांक २ मध्येही मराठीमध्ये ५१ टक्के, गणितात ६६ टक्के आणि इंग्रजीमध्ये ५३ टक्के विद्यार्थी निपुण स्तरावर पोहोचल्याचे सांगण्यात आले.

याच अनुभवाच्या आधारावर ‘निपुण पालघर २.०’मध्ये अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून कृती पुस्तिकेवर आधारित ४५ दिवसांचा विशेष कार्यक्रम, त्यानंतर आठ आठवड्यांचा साप्ताहिक कृती कार्यक्रम आणि आवश्यकतेनुसार उपचारात्मक अध्यापन राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विद्यार्थ्यांचे भाषण, वाचन, लेखन आणि गणन ही मूलभूत कौशल्ये अधिक भक्कम करण्यावर विशेष भर राहणार असल्याचेही या दरम्यान नमूद करण्यात आले.

दुसरीकडे, निपुण स्तर गाठलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील प्रगतीसाठी अध्ययन समृद्धी, वाचन अभियान, सर्जनशील लेखन, स्पोकन इंग्लिश आणि स्पेलिंग बी यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, "तद्वतच शिष्यवृत्ती, नवोदय आणि NMMS या स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन, तज्ज्ञांचे अतिरिक्त मार्गदर्शन तसेच OMR शीटवर सरावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


या अभियानासाठी विनोबा ॲप, संपर्क फाउंडेशन, रूम टू रीड आणि सिखे संस्था यांचे सहकार्य लाभणार आहे. ऑनलाइन प्रणाली, डेटा विश्लेषण, माहिती संकलन, स्मार्ट डिव्हाईस आधारित कृती, वाचन अभियान आणि शैक्षणिक जत्रा अशा उपक्रमांची माहिती देणारे स्टॉलही कार्यक्रमस्थळी उभारण्यात आले होते. शिक्षक व विद्यार्थ्यांना आधुनिक अध्यापन साहित्य आणि आनंददायी अध्ययन पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी घेता आला.


कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी विद्या दीक्षित, विस्तार अधिकारी नितीन राऊत, निपुण पालघर समन्वयक तानाजी डावरे, केंद्रप्रमुख विनोद पाटील, मुख्याध्यापिका अश्विनी राऊत यांच्यासह पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.




Leave Your Comments