शिरगाव सागरी किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी दांडेकर महाविद्यालयाचा पुढाकार*

Date: 2026-09-29
news-banner
नवयुग पालघर

***शिरगाव सागरी किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी दांडेकर महाविद्यालयाचा पुढाकार**

पालघर : गणपती विसर्जनानंतर शिरगाव सागरी किनाऱ्यावर साचलेले निर्माल्य, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा हटवून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जागतिक सागरी किनारा स्वच्छता सप्ताहानिमित्त आयोजित या मोहिमेत रासेयोच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत समुद्रकिनारा स्वच्छ केला.

गणेशोत्सवाच्या काळात मूर्ती विसर्जनामुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा जमा झाला होता. सागरी पर्यावरणाचे संरक्षण, किनाऱ्याची स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त समुद्रकिनाऱ्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या रासेयो विभागाने ही विशेष मोहीम आयोजित केली.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रोहित गायकवाड, डॉ. प्रकाश घरत, प्रा. रेणू दुबे, प्रा. भक्ती अरेकर तसेच महेश वर्तक यांनी मोहिमेच्या नियोजन व आयोजनासाठी सहकार्य केले.

स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी शिरगाव किनाऱ्यावर विखुरलेले निर्माल्य, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या तसेच अन्य कचरा गोळा करून किनारा स्वच्छ केला. स्वच्छता मोहिमेद्वारे समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्यामुळे सागरी पर्यावरणावर होणारे परिणाम आणि प्लास्टिक कचऱ्याचे वाढते संकट याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘स्वच्छ समुद्रकिनारा हीच निरोगी सागरी परिसंस्थेची ओळख’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जपली. शिरगावप्रमाणेच इतर सागरी किनारपट्टीवरही अशा प्रकारचे स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

Leave Your Comments