माती-पाण्याच्या संवर्धनासाठी एक रील ठरेल तुमचा संदेश; युवक-युवतींना २५ हजारांचे बक्षीस*** *जलसंधारण दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ स्पर्धा; १५ ते ३० वयोगटासाठी संधी

Date: 2026-08-19
news-banner

नवयुग पालघर
***माती-पाण्याच्या संवर्धनासाठी एक रील ठरेल तुमचा संदेश; युवक-युवतींना २५ हजारांचे बक्षीस***
*जलसंधारण दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ स्पर्धा; १५ ते ३० वयोगटासाठी संधी*

पालघर, दि. १४ : माती आणि पाणी हे भविष्यातील सुरक्षित जीवनाचे आधार आहेत. या दोन्हींच्या संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील युवक-युवतींना आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कल्पकता दाखवण्याची संधी मिळणार आहे. जलसंधारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ ही जिल्हास्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींनी या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.

२१ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ही रील स्पर्धा घेण्यात येत आहे.
 ‘माती वाचवा, पाणी वाचवा, सुरक्षित उद्या घडवा’ हे स्पर्धेचे घोषवाक्य आहे.

स्पर्धकांनी आपल्या रीलमधून मातीसंवर्धन, जलसंधारण, पाणी बचत, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच पाणी आणि मातीच्या संवर्धनासाठीच्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा संदेश प्रभावीपणे मांडायचा आहे. रीलची लांबी ३० ते ६० सेकंद असणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी तयार केलेली रील स्पर्धकाच्या सार्वजनिक सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध करावी लागणार आहे. रीलच्या सुरुवातीला स्पर्धेचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव सांगणे बंधनकारक आहे. संबंधित विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्याला टॅग करणे तसेच #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणेही अनिवार्य आहे.

जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या रीलमधून उत्कृष्ट रीलची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ म्हणून सन्मानित केले जाणार असून, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रकासह आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये असे पारितोषिक आहे.

स्पर्धेतील सहभागाची प्रक्रिया ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयाने मान्यता दिलेल्या संस्थेमार्फत अधिकृत क्यूआर कोड तयार करण्यात येणार असून, त्याद्वारे नोंदणी → रील लिंक सादर करणे → जिल्हा निवड → पडताळणी → सहभाग प्रमाणपत्र अशी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://register.mahaevent.co.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

////‘एक रील... मातीसाठी! एक रील... पाण्यासाठी! एक रील... सुरक्षित भविष्यासाठी!’ 
या संदेशातून युवक-युवतींनी आपली कल्पकता आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करावी, तसेच या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी फरीद खान आणि जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे./////

Leave Your Comments