** पालघर नगराध्यक्षपद : आकडेवारी, प्रभाग आणि समाजकारणावर आधारलेला कौल कुणाच्या बाजूने?**

Date: 2025-12-20
news-banner
             नवयुग पालघर विशेष

 नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ...
या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अंदाज वर्तविणारा हा विश्लेषणवजा लेख.. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर हा लेख येथे देत आहोत. या विश्लेषणाशी नवयुग पालघरचा सहमत असेलच असे नाही...


** पालघर नगराध्यक्षपद : आकडेवारी, प्रभाग आणि समाजकारणावर आधारलेला कौल कुणाच्या बाजूने?**


नुकत्याच पार पडलेल्या पालघर नगरपरिषदेच्या मतदानानंतर समोर आलेली आकडेवारी, प्रभागनिहाय मतदानाचे प्रमाण आणि समाजनिहाय कल पाहता, नगराध्यक्षपदाचा निकाल अजूनही पूर्णतः खुला असून लढत अत्यंत अटीतटीची झालेली आहे. कुठे अपेक्षेपेक्षा कमी मतदान, कुठे निर्णायक वर्चस्व, तर कुठे समाजकारणाची महत्त्वाची गणिते—या सगळ्यांचा एकत्रित विचार केल्यास कोण नगराध्यक्षपदी विराजमान होणार, याचा अंदाज बांधणे रंजक आणि तितकेच गुंतागुंतीचे ठरत आहे.

पूर्वेकडील प्रभाग क्रमांक १,२,३,४ आणि प्रभाग १४ मधील एकूण १६ बूथवर( १५७८८ पैकी १०९१८) हा भाग नगराध्यक्ष उत्तम घरत व दुसरे इच्छुक उमेदवार रवींद्र म्हात्रे यांचा गड मानला जात असताना, अपेक्षेपेक्षा ८ ते १० टक्के मतदान कमी झाल्याने, ज्या मतदारसंघाकडून शिवसेना शिंदे गटाला १२०० ते १५०० मतांची आघाडी मिळेल असा अंदाज होता, ती आघाडी प्रत्यक्षात मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे. हा घटक निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतो.

पश्चिमेकडील १०.५ प्रभागातील ४० बूथवर (३९,९३९ मतदारापैंकी २५,३४१ मतदारांनी आपला हक्क बजावला)
मतदानाचे प्रमाण तुलनेने समाधानकारक असले तरी, एकूण १५ प्रभागांपैकी फक्त १,८,१०,१२ व १३ ह्या ५ प्रभागांमध्ये उबाठा गटाचे उमेदवार पहिल्या क्रमांकावर राहतील, तर उर्वरित १० पैकी ९ प्रभागांमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर राहतील, असे चित्र दिसते. यामुळे एकंदर मतवाटप मोठ्या प्रमाणात विभागले गेलेले दिसते.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये उत्तम घरत यांना सर्वाधिक मताधिक्य मिळण्याची शक्यता, तसेच प्रभाग क्रमांक ६ व ७ मध्ये कैलास म्हात्रे यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता, हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. कारण एकंदर ३६,२५९ मतदानांपैकी सुमारे १२ ते १३ हजार मते उत्तम पिंपळे, प्रीतम राऊत, लुलानिया, ठाकरे हे इतर उमेदवार आणि नोटा यांच्यात विभागली जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उर्वरित २३ ते २४ हजार मतांपैकी १२,५०० पेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार थेट विजयाच्या जवळ पोहोचतो.

वंजारी समाजाचा जवळपास ९५ टक्के कल उत्तम पिंपळे यांच्याकडे असल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे मोरे, कुणबी समाजाचा कल उत्तम घरत यांच्याकडे आणि आगरी समाजाचा कल कैलास म्हात्रे यांच्याकडे गेला असल्यास, कैलास म्हात्रे यांच्यासाठी ही बाब मोठी जमेची बाजू ठरू शकते. एकंदर  उत्तम घरत व  कैलास म्हात्रे हे दोन्ही उमेदवार १२,५०० चा पल्ला गाठू शकतात असे दिसून येते.
भाजपाचा १७ ते १८ टक्के पक्षाचा एकनिष्ठ मतदार (कोर वोट बेस ) (सुमारे ६००० मते), त्यांच्यासोबत असलेले उमेदवार व मतदार (५ ते ६ हजार), तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे, अपक्ष आणि उबाठा गटाकडून झालेली छुपी मदत, या सर्वांचा एकत्रित परिणाम पाहता कैलास म्हात्रे हे १३ हजारांहून अधिक मतांचा टप्पा गाठू शकतात, असा अंदाज मांडला जातो.

निष्कर्ष

संपूर्ण आकडेवारी, प्रभागनिहाय आघाडी आणि समाजनिहाय मतदानाचा कल पाहता, नगराध्यक्षपदाची लढत शेवटच्या फेरीपर्यंत रंगणार असल्याचे चित्र आहे. उत्तम घरत आणि कैलास म्हात्रे हे दोघेही १२,५०० मतांचा निर्णायक टप्पा गाठू शकतात. त्यामुळे अल्प फरकाने निकाल लागण्याची दाट शक्यता असून, अखेरीस कोण विराजमान होणार हे मतमोजणीच्या अंतिम आकड्यांवरच ठरणार आहे.

Leave Your Comments