नवयुग पालघर
****५,३९४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण; १०५.१० कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा****
**मोखाड्यात विशेष मोहीम; तलासरी-डहाणूतील पूरस्थितीमुळे काही विलंब, प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार**
**5,394 farmers complete Aadhaar verification; ₹105.10 crore farm loan waiver moves ahead in Palghar**
पालघर, दि. ३० जुलै : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील ५ हजार ३९४ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, आणखी ५ हजार ९० शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे बाकी आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची एकूण १०५ कोटी १० लाख ७० हजार रुपयांची कर्जरक्कम माफ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड तसेच जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी दिली. उर्वरित लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थी पी. व्ही. अमल तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भेरे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे ही योजना जाहीर केली आहे. यामध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ असे तीन प्रमुख घटक आहेत, :
*योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेले पीक कर्ज तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित पीक कर्ज पात्र ठरणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पात्र कर्ज दोन लाख रुपयांपर्यंत माफ करण्यात येणार आहे.
*दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (ओटीएस) लागू करण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत बँकेत भरल्यानंतर त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
*तसेच २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची वेळेत परतफेड करून २०२५-२६ मधील कर्जही नियमानुसार फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी महा-आयटीने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीवर राज्यभरातील बँकांनी ३१.१७ लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. त्यामध्ये १०.०१ लाख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आणि २१.१६ लाख व्यापारी बँकांची कर्जखाती आहेत.
पालघर जिल्ह्यातील बँकांनी १४ हजार ५३ कर्जखाती योजनेसाठी सादर केली आहेत. त्यामध्ये ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्जखाती १३,०७१ तर कर्जमाफी रक्कम ८९ कोटी ५१ लाख व व्यापारी बँकांची ९८२ कर्जखाती आहेत.जिल्ह्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४२ शाखा असून पैकी ३७ शाखांद्वारा पीककर्ज वाटप झाले आहे.
महा-आयटीने केलेल्या छाननीनंतर २५ जुलै २०२६ रोजी पहिल्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातील १० हजार ४८४ कर्जखाती आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये १० हजार २५६ सहकारी बँकेची आणि २२८ व्यापारी बँकांची कर्जखाती आहेत. या यादीत सध्या दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या कर्जखात्यांचा समावेश असून, उर्वरित तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या खात्यांचा समावेश पुढील याद्यांमध्ये केला जाणार आहे.
आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्या बँक शाखा, ग्रामपंचायत, चावडी, विकास संस्था तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रमाणीकरणावेळी आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक किंवा कर्जरकमेबाबत काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शासनाने अनुत्पादित (एनपीए) कर्जखात्यांबाबतही सवलतीची (Haircut) योजना लागू केली आहे. त्यानुसार एनपीए झालेल्या कालावधीनुसार ३५, ४५, ५५, ७० आणि ८५ टक्के तडजोडीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तसेच १ एप्रिल २०२६ नंतर पात्र कर्जखात्यांवर अतिरिक्त व्याज आकारू नये, असे निर्देशही बँकांना देण्यात आले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार पालघर (१,०१२), वाडा (१,०३१), विक्रमगड (८६३), मोखाडा (८१७) आणि डहाणू (६७७) येथे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप मोखाड्यात १,६५५, डहाणूत १,२६८, तलासरीत ७३२, जव्हारमध्ये ५०७, पालघरमध्ये ३२७, वाड्यात ३१४, विक्रमगडमध्ये २६३ आणि वसईत २४ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. जाखड म्हणाल्या की, मोखाडा हा दुर्गम व आदिवासी भाग असल्याने तेथील उर्वरित लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच तलासरी आणि डहाणू तालुक्यांमध्ये अलीकडील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे काही शेतकऱ्यांना प्रमाणीकरणासाठी येणे शक्य झाले नाही. परिस्थिती पूर्ववत होत असून संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून उर्वरित लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना विलंब न करता आधार प्रमाणीकरण पूर्ण करून शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
(English):
**5,394 farmers complete Aadhaar verification; ₹105.10 crore farm loan waiver moves ahead in Palghar**
Palghar district has completed Aadhaar verification for 5,394 eligible farmers under the Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers' Loan Waiver Scheme-2026, while 5,090 farmers are yet to complete the process. The district is set to waive ₹105.10 crore in eligible farm loans, according to District Collector Dr. Indu Rani Jakhar and District Deputy Registrar Kishan Ratnale.
The scheme covers eligible crop loans disbursed between April 1, 2019, and March 31, 2025, with loan waivers of up to ₹2 lakh for eligible overdue accounts. Farmers with higher outstanding dues can avail benefits through the One-Time Settlement (OTS) scheme, while regular loan repayers are eligible for an incentive of up to ₹50,000.
Special Aadhaar verification drives are underway in Mokhada, while verification in Dahanu and Talasari was delayed due to recent floods. Officials said the remaining process will be completed soon and urged all eligible farmers to complete Aadhaar verification without delay to receive the scheme's benefits.