नवयुग पालघर
***लोकनेत्या ताराबाई नरसिंह वर्तक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ : केळवे रोड येथे तारा माईंच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन****
केळवे रोड, दि. २२ : महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या लोकनेत्या ताराबाई नरसिंह वर्तक (तारा माई) यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ केळवे रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या माजी अध्यक्षा असलेल्या तारा माईंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदुताई वर्तक विश्रामधाम (वृद्धाश्रम) येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ताराबाई नरसिंह वर्तक यांचा जन्म १९ ऑगस्ट १९२६ रोजी बोर्डी येथे झाला. त्यामुळे त्यांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण होत असताना, १९ ऑगस्ट २०२६ पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आहे. १९७२ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून जात त्यांनी इतिहास घडविला. त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या . त्यानंतर १९८० मध्ये त्या महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या आणि महाराष्ट्र शासनात समाजकल्याण राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
तारा माईंचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित राहिले नाही. विशेषतः वसई-विरार परिसरातील शिक्षणाचा विस्तार, समाजसेवा आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत आणि सामाजिक उपक्रमांना दिशा देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यामुळे समाजातील विविध घटकांसाठी त्या आजही प्रेरणास्थान आहेत.
जन्मशताब्दी वर्षारंभ कार्यक्रमाला संघाच्या विश्वस्त नमिता राऊत, संघाचे चिटणीस विविध पाटील, विश्रामधाम समितीचे माजी प्रमुख अशोक राऊत, आरोग्यधाम समितीचे चिटणीस पंकज म्हात्रे, विश्रामधाम समितीचे उपप्रमुख चंद्रशेखर पाटील, विश्रामधामच्या व्यवस्थापिका सुजाता सोहनी तसेच विश्रामधामचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी तारा माईंच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या समाजसेवेच्या प्रेरणादायी वारशाला अभिवादन केले. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने तारा माई यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा नव्या पिढीपर्यंत विचार आणि प्रेरणा पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.