नवयुग पालघर
**ग्रामीण भागातील जिद्द आणि विज्ञानाची साथ: ऑलिंपिक स्तरावरील क्रीडा क्रांतीची वेळ!**
खूप वर्षांपूर्वी मनात रुजलेली 'हेल्थ अँड फिटनेस'ची आवड आणि त्याविषयीचे कुतूहल, इथूनच माझा क्रीडा विज्ञानाचा प्रवास सुरू झाला। पालघर जिल्ह्यातील उनभाट सारख्या एका छोट्या पण अत्यंत छान गावात माझा जन्म झाला असून, मला मी पालघर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा सार्थ अभिमान आहे। मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे। आज मी ज्या टप्प्यावर पोहोचलो आहे, या संपूर्ण प्रवासात कुटुंबातील प्रामुख्याने माझ्या वडिलांच्या खंबीर साथीसोबतच माझी आई, भाऊ आणि बहीण या सर्वांनी मला या मोलाची साथ दिली आहे। कुटुंबाची हीच भक्कम साथ आणि ग्रामीण मातीचे संस्कार यांच्या जोरावरच मी डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, मुंबई येथून व्यायाम शास्त्र ('Exercise Science' )मध्ये पदवी आणि त्यानंतर वैद्यकीय आहारशास्त्र '(Medical Nutrition)' मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले। मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये काही वर्षांपासून 'व्यायाम शरीरक्रिया तज्ज्ञ (Exercise Physiologist' ) म्हणून कार्य करत असतानाच, आता रिलायन्स फाउंडेशनच्या 'नॅशनल ऑलिंपिक प्रोग्राम'मध्ये माझी निवड झाली आहे.
मी गेल्या काही वर्षांपासून अनेक खेळांना आणि स्पोर्ट्स संस्कृतीला अतिशय जवळून पाहिले आहे, तसेच विविध स्तरांवर खेळाडूंसोबत प्रत्यक्ष काम केले आहे। सध्या मी रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून थेट हरियाणा येथे कार्यरत असून, आपल्या देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे अव्वल कुस्तीपटू (Wrestlers) आणि बॅडमिंटनचे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे वलयांकित खेळाडू यांचा व्यायाम आणि रिहॅब (Rehab) स्वतः घेत आहे। या जागतिक स्तरावरील क्रीडापटूंची फिटनेस पातळी सर्वोच्च राखणे आणि त्यांच्या मैदानातील कामगिरीत सातत्याने सुधारणा करणे या मुख्य जबाबदारीवर मी सध्या काम करत आहे.
आपल्या ग्रामीण भागातही मुलांमध्ये अफाट टॅलेंट (Talent) दडलेले आहे आणि ही मुले मैदानावर मनापासून स्पोर्ट्स खेळतात। परंतु, या नैसर्गिक टॅलेंटला योग्य स्तरावर खंबीरपणे 'पाठिंबा देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण आपल्या भागातही खूप गुणवत्ता आहे। आपल्या ग्रामीण भागात अजूनही 'स्पोर्ट्स' म्हणजे पाल्यांना केवळ खेळात गुंतवणे हा समज आहे। पण प्रत्येक व्यक्तीची शरीररचना आणि त्याची कार्यक्षमता वेगळी असते। म्हणूनच मुलांना त्यांच्या आवडी आणि कौशल्य (Skills) ओळखून, आधुनिक क्रीडा विज्ञानाचे योग्य रितीने अंमलबजावणी करून दिली पाहिजे। जर योग्य स्पोर्ट्सची निवड केली, तर नक्कीच आपण भविष्यातील कित्येक खेळाडू या ग्रामीण भागातून निर्माण करू शकतो.
**क्रीडा विज्ञानाचा गाभा: 'Scientific Approach' आणि प्रगत ज्ञान**
आधुनिक क्रीडा क्षेत्रात केवळ कठोर सराव पुरेसा नसून, त्याला क्रीडा विज्ञानाची अचूक जोड देणे अनिवार्य आहे। जेव्हा एखादा खेळाडू मैदानावर खेळतो, तेव्हा त्याच्या शरीरातील स्नायू, हाडे आणि मज्जासंस्था (Nervous System) एका विशिष्ट लयीत काम करत असतात। हे विज्ञानाच्या आधारे समजून घेणे आणि त्यानुसार त्याचे प्रशिक्षण डिझाइन करणे म्हणजेच खरा 'Scientific Approach' होय। यासाठी आम्ही मुख्यतः तीन वैज्ञानिक घटकांवर काम करतो:
१. बायोमेकॅनिक्स आणि मूव्हमेंट पॅटर्न (Biomechanics & Movement Patterns): प्रत्येक खेळाची शारीरिक मागणी वेगळी असते। कुस्तीमध्ये रोटेशनल स्टेबिलिटी (rotational stability) म्हणजेच शरीराचा फिरतानाचा तोल, हिप एक्स्प्लोझिव्हिटी (hip explosivity) आणि गळ्याची ताकद (neck strength) अत्यंत महत्त्वाची असते, तर बॅडमिंटन सारख्या कोर्ट गेम्समध्ये खेळाडूचा चेंज ऑफ डिरेक्शन (Change of Direction) आणि पायांची चपळाई महत्त्वाची ठरते। बायोमेकॅनिक्सच्या मदतीने हालचालींमधील त्रुटी दूर केल्यास शरीराची कार्यक्षमता वाढते आणि ऊर्जा वाया जात नाही.
२. न्यूरोमस्कुलर प्राइमिंग आणि रेट ऑफ फोर्स डेव्हलपमेंट (Neuromuscular Priming & RFD): सामन्यापूर्वी किंवा प्रशिक्षणापूर्वी मज्जासंस्थेला जागृत करणे म्हणजे न्यूरोमस्कुलर प्राइमिंग होय। यामुळे मेंदू आणि स्नायू मधील संदेश वहन जलद होते। याचा थेट फायदा 'रेट ऑफ फोर्स डेव्हलपमेंट' (Rate of Force Development - RFD) वाढवण्यासाठी होतो। RFD म्हणजे अत्यंत कमी वेळेत (उदा. सेकंदाच्या काही भागात) स्नायूंनी जास्तीत जास्त ताकद निर्माण करणे। कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्यावर अचानक हल्ला करताना किंवा बॅडमिंटनमध्ये वेगवान स्मॅश मारताना हाच वैज्ञानिक घटक विजयाचा फरक ठरवतो.
३. लोड मॅनेजमेंट, न्यूट्रिशन आणि इंज्युरी प्रिव्हेंशन (Load Management & Clinical Nutrition): खेळाडूंना होणाऱ्या दुखापती या बऱ्याचदा अति-प्रशिक्षण (Overtraining) किंवा चुकीच्या 'लोड मॅनेजमेंट' मुळे होतात। स्पोर्ट्स सायन्सच्या मदतीने आम्ही खेळाडूचा दररोजचा शारीरिक डेटा गोळा करतो, ज्यामुळे स्नायूंच्या थकव्याचा अंदाज येतो। दुखापत होण्यापूर्वीच शरीराला योग्य रिकव्हरी प्रोटोकॉल्स आणि 'क्लिनिकल न्यूट्रिशन' (योग्य पोषण) दिले जाते। मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्सचे योग्य संतुलन स्नायूंची झीज भरून काढते। यामुळे दुखापत टाळणे (Injury Prevention) आणि दुखापत झाल्यास जलद गतीने पुनर्वसन (Rehabilitation) करणे सहज शक्य होते।
"जेव्हा ग्रामीण मातीची अदम्य जिद्द आधुनिक क्रीडा विज्ञानाशी हातमिळवणी करते, तेव्हा जागतिक मंचावर ऑलिंपिक पदकांचा नवा इतिहास लिहिला जातो."
**मातीचे ऋण आणि पालकांना आवाहन**
माझ्या या धडपडीत कोणताही स्वार्थ नाही। मी याच मातीतील व्यक्ती आहे आणि माझ्या मातीसाठी काहीतरी देणे लागते, याच भावनेतून उमटलेले हे माझे शब्द आहेत। ग्रामीण भागातील युवा पिढीच्या मनात अतिशय घट्ट जिद्द, चिकाटी आणि अफाट टॅलेंट दडलेले असते; गरज आहे फक्त योग्य मार्गदर्शनाची। सर्व खेळाडू, विद्यार्थी आणि पालकांमध्ये हेल्थ, फिटनेस आणि स्पोर्ट्स सायन्स बद्दल जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून ग्रामीण भागातील मुले भविष्यात देशाचे नाव जगभरात मोठे करतील।
आपल्या हेल्थ अँड फिटनेस कडे नक्की लक्ष द्या आणि आपल्या आई-वडिलांची काळजी घ्या!
**लेखक:** आतिष सुनिल मोरे (Exercise Physiologist, Sir H. N. Reliance Foundation Hospital, Mumbai | रिलायन्स फाउंडेशन नॅशनल ऑलिंपिक प्रोग्राम)