नवयुग पालघर
****ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीचा झेंडा****
**अखेरच्या क्षणी फिरले राजकीय गणित; अरुण पाटील अध्यक्ष, भाग्यश्री नीलेश भोईर उपाध्यक्ष**
ठाणे, ११ जुलै : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी राजकीय डाव उलटला. बहुजन विकास आघाडीला एकाकी पाडत निवडणुकीत आमनेसामने लढलेले परिवर्तन पॅनलचे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील तसेच सहकार पॅनलचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिंदे पक्षाने एकत्रित युती करत भाजपचा उमेदवार निवडून आणला. अध्यक्षपदी अरुण पाटील, तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री नीलेश भोईर यांची निवड झाली.
२7 जूनला मतदान, २8 जूनला निकाल;
११ जुलैला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी २८ जून रोजी मतदान झाले. २९ जून रोजी मतमोजणी होऊन नव्या संचालक मंडळाची निवड झाली. त्यानंतर ११ जुलै रोजी नव्या संचालक मंडळातून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली.
सुरुवातीला एकजुटीचे प्रदर्शन
या निवडणुकीत सहकार पॅनलचे (ज्यामध्ये भाजपचे किसन कथोरे, शिवसेना (शिंदे) तसेच बहुजन विकास आघाडीचा समावेश होता) १६ सदस्य निवडून आले होते. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक होईपर्यंत हे सर्व सदस्य बाहेरगावी एकत्रित मुक्कामाला होते. गेले अनेक दिवस ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाहून एकीचे फोटो झळकवत राहिले होते. १० जुलैच्या रात्री ते परतले. निवडणुकीच्या दिवशी सकाळपर्यंतही हे सर्व आपल्या एकीचे दर्शन घडवत होते.
पडद्यामागे सुरू होती वेगळी राजकीय जुळवाजुळव
मात्र दुसऱ्या बाजूने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर वेगळेच राजकारण आकार घेत होते. या निवडणुकीत कथोरे यांनी शिंदे व ठाकूर यांच्याशी युती केली असली तरी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपची सत्ता असावी, अशी भूमिका मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार पडद्यामागे जुळवाजुळव सुरू झाली. निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण यांनीही नव्या युतीचे संकेत दिले होतेच
.
कपिल पाटील-कथोरे समीकरण ठरले निर्णायक
या घडामोडींमध्ये सर्वात मोठा अडथळा किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्या एकत्र येण्याचा होता. कथोरे यांना कपिल पाटील अध्यक्षपदी नको होते, अशी चर्चा होती. दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांच्याशी युती केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सहकार पॅनलमधून वेगळी भूमिका घेणे सोपे नव्हते. निवडून आल्यानंतर खासदार एकनाथ शिंदे व आमदार क्षितिज ठाकूर यांची एकत्रित पत्रकार परिषद देखील झाली होती.
मात्र राज्य पातळीवरील महायुतीचे समीकरण लक्षात घेऊन भाजपने एकनाथ शिंदे यांचे मन या बाजूने वळवले. दुसऱ्या बाजूला कपिल पाटील यांनी आपण अध्यक्षपदाचे उमेदवार नसल्याचे जाहीर केल्याने किसन कथोरे यांच्यासमोर युतीशिवाय पर्याय उरला नाही. वरिष्ठ पातळीवरून कथोरे यांच्यावरही दबाव आल्याची चर्चा आहे. मात्र यात कथोरे व शिंदे या दोघांकडूनही बविआ म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांना दगाफटका झाल्याचे स्पष्ट दिसते.
निवडणुकीच्या दिवशी सकाळीच बदलले चित्र
या सर्व घडामोडींची परिणती म्हणून निवडणुकीच्या दिवशी सकाळीच सर्व राजकीय चक्र फिरली आणि महायुतीने अरुण पाटील यांना अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार घोषित केले.
सुरुवातीला परिवर्तन पॅनलकडून आकाश बाबाजी पाटील, तर बहुजन विकास आघाडीकडून मनीष राजेंद्र पाटील रिंगणात होते. मात्र सहकार पॅनलमधून हितेंद्र ठाकूर यांना एकाकी पाडले जात असल्याचे स्पष्ट होताच आणि महायुतीचा एकच उमेदवार देण्याचा निर्णय झाल्यानंतर परिवर्तन पॅनलने आपला उमेदवार मागे घेतला. त्यानंतर परिवर्तन पॅनलच्या पाचही संचालकांनी महायुतीला पाठिंबा दिला.
१४ विरुद्ध ७ अशी सरळ लढत
यानंतर चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले. बहुजन विकास आघाडीचे चार संचालक, माकपचा एक संचालक, बहुजनच्या बाजूने माजी आमदार सुनील भुसारा तसेच ठाण्यातील मुंबईकर अशा एकूण सात सदस्यांचे संख्याबळ बहुजन विकास आघाडीच्या बाजूने राहिले.
दुसरीकडे सहकार पॅनलमधील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि परिवर्तन पॅनलचे पाच संचालक असे मिळून १४ सदस्य महायुतीच्या बाजूने उभे राहिले. १४ विरुद्ध ७ अशा स्पष्ट बहुमतामुळे अरुण पाटील अध्यक्षपदी निवडून आले.
उपाध्यक्षपद बिनविरोध
सुरुवातीला उपाध्यक्षपदासाठी भाग्यश्री नीलेश भोईर, बहुजन विकास आघाडीकडून अमित घोडा आणि परिवर्तन पॅनलकडून ज्योती दिलीप पटेकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र मतदानापूर्वी अमित घोडा आणि ज्योती दिलीप पटेकर यांनी माघार घेतल्याने भाग्यश्री नीलेश भोईर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
अखेर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित करत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील सत्ता आपल्या ताब्यात घेतली.