नवयुग पालघर
****वाढवण बंदरासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांत फेरबदल****
पालघर : वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देताना सक्षम प्राधिकाऱ्यांच्या (CALA) जबाबदाऱ्यांमध्ये प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून नव्या व्यवस्थेनुसार डहाणू क्षेत्राची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशाल खत्री (IAS) यांच्याकडे, तर पालघर क्षेत्राची जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
यापूर्वी पालघरची जबाबदारी उपजिल्हाधिकारी महेश सागर, तर डहाणूची जबाबदारी तेजस चव्हाण सांभाळत होते. अशातच, विशेषतः वाढवण बंदराच्या भूसंपादनाला वेग आलेला असल्याचा दावा केला जात असताना तसेच जमीन ताबा, मोबदला व स्थानिक पातळीवरील विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल झाल्याने त्यामागील नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
प्रशासनाने मात्र या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाच्या गरजा आणि सद्यस्थितीतील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन CALA यांच्या जबाबदाऱ्यांचे पुनर्वाटप करण्यात आल्याचे म्हटले आहे
वाढवण प्रकल्पाशी संबंधित भूसंपादन प्रक्रियेत यापूर्वी महेश सागर आणि तेजस चव्हाण हे प्रमुखपणे कार्यरत असल्याचे विविध अहवालांत नमूद झाले आहे. फेब्रुवारी २०२६मध्ये झालेल्या आढावा बैठकीतही महेश सागर, तेजस चव्हाण आणि श्याम मदनूरकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, भूसंपादन प्रक्रिये अंतर्गत एकूण ५३१.६४ हेक्टर क्षेत्रासाठी 3D अधिसूचना पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी ४८४.१८ हेक्टर क्षेत्रासाठी 3H अनुषंगाने रक्कम जमा करणे व देयकाची प्रक्रिया सुरू आहे. तर ३४१.६४ हेक्टर क्षेत्राचा 3E अंतर्गत ताबा NHAIकडे देण्यात आला आहे.
आतापर्यंत ₹१,८४०.३५ कोटींचे निवाडे (Awards) घोषित करण्यात आले असून, त्यापैकी ₹५९६.७६ कोटींचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात मोबदला वितरण, कागदपत्रांची पडताळणी, हरकती आणि जमीन ताब्याची प्रक्रिया अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
जमीनधारकांनी त्यांच्या भूसंपादन प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे, पडताळणी, शंका किंवा चौकशीसाठी नव्याने नियुक्त संबंधित कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आह.
///अचानक फेरबदलामुळे चर्चा सुरू : नेमके कारण काय?
वाढवण बंदराच्या भूसंपादन प्रक्रियेत महेश सागर आणि तेजस चव्हाण यांच्याकडील जबाबदाऱ्या बदलून त्या विशाल खत्री आणि श्याम मदनूरकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याने प्रशासनात आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
भूसंपादनांतर्गत अनेक ठिकाणी जमीन ताबा आणि मोबदल्याची प्रक्रिया सुरू असताना हा फेरबदल झाल्याने “अचानक नेमके काय घडले हा प्रश्न उपस्थित होत आहे.///