नवयुग पालघर
****वर्षानुवर्षांची शिक्षकटंचाई , आता भरतीला जाग; पालघर जिल्हा परिषदेत ७९४ शिक्षक पदांसाठी प्रक्रिया सुरू****
पालघर, दि. २ : गेली अनेक वर्षे घडले, तेच यावर्षीही... शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले, शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम राहिली आणि उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा भार टाकून अध्यापनाचा गाडा कसाबसा सुरू ठेवला गेला. या पार्श्वभूमीवर अखेर शासन आणि पालघर जिल्हा परिषदेला शिक्षक भरतीची जाग आली असून, तब्बल ७९४ शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पवित्र प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी बुधवारपासून सुरू झाली असून ४ सप्टेंबरपर्यंत ती चालणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता असताना त्याचा थेट परिणाम अध्यापनावर होत राहिला. शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, या मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठत राहिला, माध्यमातूनही वारंवार वास्तव समोर आणले गेले. मात्र आता बहुदा1 आंदोलनांचा दबाव वाढल्यानंतर आणि शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती गंभीर बनल्यानंतर आता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
भरतीच्या सध्याच्या आकडेवारीकडे पाहिले तरी पालघरमधील शिक्षकटंचाईची व्याप्ती स्पष्ट होते. मराठी माध्यमासाठी इयत्ता २ री ते ५ वीच्या ३२८ पदांसाठी ३४७ उमेदवार उपलब्ध झाले आहेत. इयत्ता ६ वी ते ८ वी विज्ञान विषयासाठी ४०० पदांसाठी ३१७ उमेदवार, भाषा (मराठी) विषयासाठी १५ पदांसाठी २०३ उमेदवार, तर समाजशास्त्र विषयासाठी १६ पदांसाठी १६ उमेदवार उपलब्ध झाले आहेत.
उर्दू माध्यमात इयत्ता २ री ते ५ वीकरिता २२ पदांसाठी ५ उमेदवार, इयत्ता ६ वी ते ८ वी विज्ञान विषयासाठी ११ पदांसाठी १० उमेदवार, तर भाषा (उर्दू) विषयासाठी २ पदांसाठी १ उमेदवार उपलब्ध झाला आहे.
या आकडेवारीनुसार, मराठी आणि उर्दू माध्यमातील विविध संवर्गांमध्ये मिळून ७९४ शिक्षक पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र उपलब्ध उमेदवारांची संख्या सर्वच पदांसाठी पुरेशी नसल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते. विशेषतः विज्ञान आणि उर्दू माध्यमातील काही पदांसाठी उपलब्ध उमेदवारांची संख्या रिक्त पदांपेक्षा कमी आहे.
त्यामुळे भरती प्रक्रिया सुरू झाली असली तरी सर्व रिक्त पदे प्रत्यक्षात भरली जाणार का आणि नियुक्त शिक्षक शाळांमध्ये कधी रुजू होणार, हा खरा प्रश्न आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे. पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५च्या आधारे पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये ही भरती होत आहे.
प्राप्त यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी
२ ते ४ सप्टेंबरदरम्यान जिल्हा परिषद पालघर कार्यालयात होत आहे. उमेदवारांनी जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिद्ध वेळापत्रकानुसार आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, शिक्षक भरतीचा निर्णय उशिरा का झाला, हा प्रश्नही या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षक उपलब्ध झाले असते तर विद्यार्थ्यांचे अध्यापन अधिक सुरळीत झाले असते. आता तीन महिने उलटल्यानंतर सुरू झालेली प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षक प्रत्यक्ष वर्गात कधी पोहोचतात, यावर या भरतीचा खरा परिणाम अवलंबून आहे.
🌐 navyugpalghar.com
Facebook | X | YouTube | Instagram
#शिक्षकभरती #शिक्षकभरती2026 #शिक्षक #शिक्षण #पालघर #महाराष्ट्र #नवयुगपालघर