वाहतूक परवाना नसल्याने ग्रामस्थांनी वाणगाव–वरोर दगड वाहतूक रोखली

Date: 2026-09-29
news-banner
नवयुग पालघर
***वाहतूक परवाना नसल्याने ग्रामस्थांनी वाणगाव–वरोर दगड वाहतूक रोखली***

वाढवण बंदरासाठी सुरू असलेल्या रस्ते बांधकामासाठी वाणगाव येथील साठवण केंद्रातून वरोरकडे सुरू असलेली दगडाची अवजड वाहतूक आसनगाव, माटगाव व पंचक्रोषीतील ग्रामस्थांनी दोन दिवस रोखली. या वाहतुकीसाठी वाणगाव येथील साठवण केंद्रापासून वरोरपर्यंतचा आवश्यक वाहतूक परवाना नसल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप असून, याबाबत मंडळ अधिकारी वाणगाव आणि ग्राम महसूल अधिकारी आसनगाव यांच्या उपस्थितीत लेखी पंचनामा करण्यात आला आहे.
पंचनाम्यानुसार, ग्रामस्थांनी वाणगावकडून वरोरच्या दिशेने जाणारी दगडाने भरलेली वाहने अडविल्यानंतर पोलीस प्रशासन आणि महसूल कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले. वाहनांची वाहतूक आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दगडाची वाहतूक वाणगाव येथील संबंधित कंपनीच्या साठवण केंद्रातून होत असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
वाणगाव येथील साठवण केंद्रापर्यंतची रॉयल्टी असल्याचे नमूद करताना, तेथून वरोरपर्यंत दगड वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र आवश्यक परवाना असणे गरजेचे असल्याचा महसूल विभागाच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेचा उल्लेख पंचनाम्यात आहे. त्यामुळे संबंधित वाहतूक बेकायदेशीर असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.
         पंचनाम्यात दगड वाहतूक करणार्‍या दहा वाहनांचे क्रमांकही नमूद करण्यात आले आहेत. यामध्ये श्प्४८ Dण् ४४४५, श्प्४८ D६ें ४४४५, श्प्४८ झ्ए ४४४५, श्प्४८ ण्ँ ४४४५, श्प्४८ Dैं ४४४५, श्प्४८ँेंर्  १४६१, श्प्४८ Dण् ४४६८, श्प्४८ ण्ैं ९२९९, श्प्४८ ण्A ९३०२ आणि श्प्४८ Dैं २६१२ या वाहनांचा समावेश आहे. संबंधित वाहने क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला असून, कायदेशीर तसेच दंडनीय कारवाई करण्याची मागणी पंचनाम्यात करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी या अवजड वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे सांगितले. तसेच वाहतुकीमुळे प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत असल्याचा त्यांचा आरोप आहे. याशिवाय या परिसरात बेकायदा उत्खनन आणि पर्यावरणाची हानी होत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
       दरम्यान, ट्रक रोखण्यावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये घटनास्थळी शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी वाहतूक अडवता येणार नसल्याचे सांगत, बेकायदेशीर वाहतूक होत असल्यास प्रशासनाकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्यास सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी यापूर्वीच लेखी तक्रारी दिल्या असून त्यावर चौकशी होत नसल्याचा आक्षेप घेतला.
वाहतुकीची कागदपत्रे आणि रॉयल्टीबाबत ग्रामस्थांनी महसूल अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, वाणगाव येथील साठवण केंद्रापासून पुढील संपूर्ण मार्गासाठी रॉयल्टी नसल्याचे महसूल कर्मचार्‍यांनी सांगितल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. यानंतर वाहतूक बेकायदेशीर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. मात्र, महसूल कर्मचार्‍यांशी ही चर्चा होण्यापूर्वीच संबंधित अवजड वाहने कंत्राटदारांकडून परत वळविण्यात आली होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या म्हणण्यानुसार, ग्रीनफिल्ड वाढवण बंदरासाठी रस्ता बांधण्याचे काम सुरू असून, त्यासाठी खदाणीतून दगड वाणगाव येथील साठवण केंद्रात आणून ठेवण्यात आला आहे. तेथून वरोर येथे रस्ते बांधकामासाठी दगडाची वाहतूक केली जात आहे. मात्र, वाणगाव ते वरोर या मार्गासाठी आवश्यक वाहतूक परवाना नसतानाही ही वाहतूक सुरू असल्याचा समितीचा आरोप आहे.
या वाहतुकीला पोलीस आणि महसूल यंत्रणेचे संरक्षण मिळत असल्याचा आरोपही संघर्ष समितीने केला आहे. संबंधित वाहतूक तात्काळ थांबवावी आणि रॉयल्टी, वाहतूक पास, वाहनांची क्षमता तसेच उत्खननाच्या परवान्यांची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही या अवजड वाहतुकीमुळे अपघात, रस्त्यांची हानी, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे केवळ ट्रक अडविण्याचा प्रश्न न ठेवता संबंधित वाहतूक, उत्खनन आणि रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या दगडाच्या स्रोतापासून अंतिम ठिकाणापर्यंतच्या परवान्यांची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
घटनेनंतर संध्याकाळी प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रात्री उशिरा सोडण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, संबंधित दगड वाहतूक प्रत्यक्षात कोणत्या परवान्यांच्या आधारे सुरू होती, रॉयल्टीची व्याप्ती नेमकी किती होती आणि वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल होता का, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत कारवाईची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Leave Your Comments