****पालघर जिल्ह्यात दहावी-बारावी पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर; बारावीत २८.८२%, दहावीत १७.३६% निकाल बारावीत १,२७३ तर दहावीत २७२ विद्यार्थी उत्तीर्ण; दोन्ही परीक्षांमध्ये मुलींची सरशी कायम****

Date: 2026-07-15
news-banner
नवयुग पालघर
****पालघर जिल्ह्यात दहावी-बारावी पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर; बारावीत २८.८२%, दहावीत १७.३६% निकाल
बारावीत १,२७३ तर दहावीत २७२ विद्यार्थी उत्तीर्ण; दोन्ही परीक्षांमध्ये मुलींची सरशी कायम****

              पालघर, दि. १४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून–जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. पालघर जिल्ह्यात बारावीचा निकाल २८.८२ टक्के, तर दहावीचा निकाल १७.३६ टक्के लागला. दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी मुलांच्या तुलनेत अधिक यश संपादन करून आघाडी कायम राखली.

*बारावी : ४,४१७ पैकी १,२७३ विद्यार्थी उत्तीर्ण*

            बारावीच्या पुनर्परीक्षेस जिल्ह्यातून ४,४१७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १,२७३ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ३,१४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण निकाल २८.८२ टक्के लागला.
            परीक्षेला २,८४१ मुले व १,५७६ मुली बसल्या होत्या. त्यापैकी ७९८ मुले (२८.०८ टक्के) आणि ४७५ मुली (३०.१३ टक्के) उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे मुलींनी निकालात पुन्हा एकदा आघाडी घेतली.
              तालुकानिहाय निकालात मोखाडा तालुका ६६.६६ टक्के निकालासह प्रथम क्रमांकावर राहिला. त्यापाठोपाठ तलासरी (४४.०१ टक्के) आणि वसई (२९.६९ टक्के) यांचा क्रमांक लागला.

*दहावी : १,५६६ पैकी २७२ विद्यार्थी उत्तीर्ण*

            दहावीच्या पुनर्परीक्षेस १,५६६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २७२ विद्यार्थी उत्तीर्ण, तर १,२९४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल १७.३६ टक्के नोंदविण्यात आला.
              परीक्षेला १,१३४ मुले आणि ४३२ मुली बसल्या होत्या. त्यापैकी १८६ मुले (१६.४० टक्के) आणि ८६ मुली (१९.९० टक्के) उत्तीर्ण झाल्या. दहावीतही मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत अधिक राहिला.

            तालुकानिहाय निकालात पालघर तालुक्याने २६.०३ टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ वसई (१८.९८ टक्के), विक्रमगड (१५.३८ टक्के), डहाणू (१०.९९ टक्के), तलासरी (६.७२ टक्के), जव्हार (५.८८ टक्के) आणि वाडा (५.३३ टक्के) असा निकाल लागला. मोखाडा तालुक्याचा निकाल ३३.३३ टक्के असला तरी परीक्षेला अत्यल्प विद्यार्थी बसल्याने त्याची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे.

**ठळक मुद्दे**

बारावी: ४,४१७ पैकी १,२७३ उत्तीर्ण, ३,१४४ अनुत्तीर्ण, निकाल २८.८२%
दहावी: १,५६६ पैकी २७२ उत्तीर्ण, १,२९४ अनुत्तीर्ण, निकाल १७.३६%

*दोन्ही परीक्षांमध्ये मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक*

 *बारावीत मोखाडा, तर दहावीत पालघर तालुका अव्वल*

             निकालानंतर पालघरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave Your Comments