नवयुग पालघर
****पालघरमध्ये पूरग्रस्तांना २२.७७ कोटींची मदत वितरित; १५,१९० लाभार्थ्यांना दिलासा
उर्वरित बाधितांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू; दुकानदार, टपरीधारकांसाठीही ९.९९ कोटींची तरतूद****
पालघर, दि. ११ ऑगस्ट : जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मदत वाटपाला वेग आला असून, आतापर्यंत १५,१९० लाभार्थ्यांच्या खात्यांवर २२ कोटी ७७ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांसाठी मंजूर असलेल्या २९ कोटी ८७ लाख रुपयांपैकी ही मदत देण्यात आली आहे. उर्वरित ७,७०७ बाधित लाभार्थ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मदत व पुनर्वसन विभागामार्फत पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी एकूण ३९ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी २९ कोटी ८७ लाख रुपये बाधित कुटुंबांसाठी, तर ९ कोटी ९९ लाख रुपये दुकानदार आणि टपरीधारकांच्या उपजीविकेच्या नुकसानीसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
कौटुंबिक मदतीमध्ये डहाणू तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक वाटप झाले आहे. डहाणूतील ५,३२१ लाभार्थ्यांना ७ कोटी ९८ लाख रुपये, वसईतील ५,००० लाभार्थ्यांना ७ कोटी ५० लाख रुपये, पालघर तालुक्यातील ३,२५५ लाभार्थ्यांना ४ कोटी ८८ लाख रुपये, तलासरीतील १,५५० लाभार्थ्यांना २ कोटी ३२ लाख रुपये, तर वाडा तालुक्यातील ६४ लाभार्थ्यांना ८ लाख २८ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
*दुकानदार, टपरीधारकांनाही मदत*
अतिवृष्टी आणि पुरामुळे व्यवसायाचे नुकसान झालेल्या दुकानदार व टपरीधारकांसाठी स्वतंत्रपणे ९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पालघर तालुक्यासाठी ३५.९५ लाख रुपये, डहाणूसाठी १.३० कोटी रुपये, तलासरीसाठी ५.५० लाख रुपये आणि वसईसाठी ५ कोटी २.५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या लाभार्थ्यांची पडताळणी आणि मदत वाटपाची प्रक्रिया सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना मंजूर मदत देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
*नुकसानभरपाईच्या रकमेतही वाढ*
जुलैतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पालघर जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये वाढ केली आहे. पूर्वीच्या निकषांनुसार १२ कोटी ८० लाख रुपये देय असताना वाढीव पॅकेजमध्ये ही रक्कम ८१ कोटी २२ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त ६८ कोटी ४० लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली आहे.
या वाढीव पॅकेजमध्ये पारंपरिक नुकसानभरपाईच्या पलीकडे जाऊन दुकाने व व्यावसायिक आस्थापना, रस्त्यावरील विक्रेते, तात्पुरत्या आस्थापना, पोल्ट्री शेड, बोटी आणि इतर पात्र उपजीविकेची साधने यांचाही समावेश करण्यात आला आहे.
दुकान किंवा व्यावसायिक आस्थापनेसाठी ५० हजार रुपये, रस्त्यावरील विक्रेते किंवा तात्पुरत्या आस्थापनांसाठी १० हजार रुपये, तर नुकसानग्रस्त पोल्ट्री शेडसाठी ५ हजार रुपये मदतीची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय पूरामुळे बाधित कुटुंबांना कपडे व घरगुती भांड्यांसाठीची मदत ५ हजारांवरून १५ हजार रुपये करण्यात आली आहे. पूर्णतः नुकसान झालेल्या घरांसाठीची मदत १.२० लाखांवरून १.५० लाख रुपये, तर अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी नुकसानीच्या प्रमाणानुसार ६,५०० ते ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद आहे.