पालघरच्या आठही तालुक्यांचे फेरसर्वेक्षण करून दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

Date: 2026-10-01
news-banner
नवयुग पालघर
***पालघरच्या आठही तालुक्यांचे फेरसर्वेक्षण करून दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा***

पालघर : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पीकवाढीच्या काळात पडलेल्या दीर्घ खंडामुळे पालघर जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पालघर, वसई, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा या आठही तालुक्यांचे गावनिहाय फेरसर्वेक्षण करून पालघर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त क्षेत्रांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार विलास तरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा जाधव पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन साद केले.

२५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा या यादीत समावेश झालेला नाही. ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने दीर्घ खंड घेतल्याने भात, नागली, वरी, ज्वारी, उडीद आणि तीळ या प्रमुख पिकांवर परिणाम झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सुरुवातीला झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसाने घेतलेल्या ओढीमुळे काही भागांत पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दुबार लागवड करावी लागली. त्यामुळे बियाणे, मजुरी आणि इतर शेती खर्चाचा अतिरिक्त भार शेतकऱ्यांवर पडला आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी, महसूल तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त पथकाने आठही तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीकस्थिती आणि नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. फेरसर्वेक्षणादरम्यान गावनिहाय पंचनामे करून जीपीएस आधारित नोंदी आणि छायाचित्रांसह नुकसानीची अधिकृत नोंद करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

केवळ एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी विचारात न घेता प्रत्यक्ष पीक किती वाचले, किती नुकसान झाले आणि शेतकऱ्यांवर झालेला आर्थिक परिणाम याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून पात्र क्षेत्राचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार विलास तरे यांनी केली आहे.

#पालघर #पालघरजिल्हा #शेतकरी #दुष्काळ #खरीपहंगाम #पीकनुकसान #फेरसर्वेक्षण #कृषी #महसूल #मदतवपुनर्वसन #विलासतरे #बोईसर #शेतकऱ्यांचाआवाज

navyugpalghar.com⁠
Facebook | X | Instagram | YouTube
नवयुग पालघरला Follow करा.

Leave Your Comments